Fri, May 24, 2019 02:36होमपेज › Belgaon › एक गाव ग्रामपंचायती मात्र पाच

एक गाव ग्रामपंचायती मात्र पाच

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 9:01PMअथणी  : प्रतिनिधी

फडतरवाडी (ता. अथणी) हे गाव पिढ्यान्पिढ्या दारिद्य्रात आहे. गावच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेच, शिवाय वाढीव 5 हजार लोकसंख्या 5 ग्रा.पं. तीत विखुरली आहे. यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत  आहे.  जिल्हा प्रशासन आणि आजीमाजी आमदारांकडे विनंती करूनही स्वतंत्र ग्रा. पं. मंजूर होत नाही. याविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दि. 11 रोजी फडतरवाडी येथे ग्रामस्थांची बैठक होणार आहे. 

स्वतंत्र ग्रा.पं.आंदोलन समितीचे निमंत्रक राम फडतरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फडतरवाडी व सभोवती शेतीवाडीत मोठी वसती आहे. सर्व लोकसंख्या मिळून 5 हजार इतकी आहे. लोकसंख्या वाढेल तसे वाढते क्षेत्र वेगवेगळ्या ग्रा.पं.ना जोडले जाते. आतापर्यंत फडतरवाडी व जवळील वसती 5 ग्रा.पं.ना जोडण्यात आली आहे. यामुळे एक गाव आणि ग्रा.पं.ती पाच अशी अवस्था झाली आहे.

सर्वप्रथम ऐगळी ग्रा.पं., त्यानंतर तेलसंग, ककमरी, कनाळ, कोहळ्ळी अशी ग्रा.पं.ची संख्या वाढतच आहे. फडतरवाडीचा विस्तारणारा भाग नवनव्या ग्रा.पं.क्षेत्रात समावेश करण्यापेक्षा फडतरवाडी येथेच नवीन ग्रा. पं. मंजूर करण्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नवीन  ग्रा. पं.  मंजूर करताना फडतरवाडीकरांवर शासन अन्याय करत आहे. फडतरवाडीपासून अन्य ग्रा.पं.कार्यालय 6 ते 11 कि.मीवर आहे. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड व वेळेचे नुकसान होत आहे. उतारा, दाखला काढण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. 

नेते निवडणुकीपुरते आश्‍वासन देऊन ग्रामस्थांची बोळवण करत आले आहेत. आ. लक्ष्मण सवदी, महेश कुमठ्ठळ्ळी यांच्याकडेही ग्रामस्थांनी दाद मागितली. स्वतंत्र  .पं.स्थापन झाल्यास 14  व्या वित्त आयोगाच्या थेट निधीचा फायदा गावच्या विकासाला होणार आहे. यासाठी ग्रामस्थ एकटवले आहेत. राम फडतरे यांच्यासह सागर कुंभारकर, हर्षद फडतरे, शरद फडतरे, संभाजी चव्हाण, पांडुरंग भोसले, अंबाजी काळे, गणपती जगदाळे, दत्तू फडतरे, बाळू वाटपकर, संजय सावंत प्रयत्नशील आहेत.


स्वतंत्र ग्रा. पं. मंजूर झाल्यास ग्रामविकासाला गती येईल. पुरेशी लोकसंख्या असतानाही शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आगामी काळात तीव्र आंदोलन करू. - राम फडतरे, निमंत्रक, स्वतंत्र ग्रा. पं. आंदोलन