Thu, Jun 27, 2019 14:17होमपेज › Belgaon › भाजप सरकार 90 टक्क्यांचे  

भाजप सरकार 90 टक्क्यांचे  

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:00AMअथणी : प्रतिनिधी 

जागतिक स्तरावर भ्रष्टाचाराच्या यादीत 2015 सालापासून भारताचा क्रमांक वाढत असून भारत आता 86 व्या क्रमांकावर आहे. आपल्या सरकारवर 10 टक्के सरकार आरोप करणारे केंद्र सरकार 90 टक्क्यांचे सरकार आहे, असा प्रत्यारोप आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अथणीतील सभेत केला. ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सबका विकास’ हा केवळ ढोंगीपणा असल्याची टीकाही केली. मुख्यमंत्री म्हणाले राज्यात आल्यानंतर मोदी व अमित शहा केवळ राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. पण त्यांना येथील विकास दिसत नाही का,  माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुमच्या पक्षातील येडियुराप्पा, कट्टा सुब्रम्हण्यम, जनार्दन रेड्डी दिसत नाहीत का? कारागृहाची हवा खाल्‍लेले येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणता, याला काय म्हणायचे? पंतप्रधान भ्रष्टाचाराचे पुरावे नसताना खोटे आरोप करीत असून ते देश चालविण्यास असमर्थ आहेत.

त्यांच्याकडे सीबीआय, आयबी अनेक एजन्सी असून भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करुन दाखवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोेट्यवधी रुपयांचा गंडा घातलेले ललीत मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी सरकारच्या सहाय्याशिवाय विदेशी गेलेचे कसे, असा सवाल त्यांनी केला.  आपल्या सरकारने शेतकर्‍यांसाठी खा.प्रकाश हुक्केरी साखरमंत्री असताना प्रत्येक  टनाला 250 प्रमाणे 1800 कोटी रुपये प्रोत्साहन धन दिल्याचे सांगून शेतकर्‍यांच्या विकासासाठी प्रयत्नशील सरकार असल्याचे सांगीतले. 

भाजपला कर्नाटकात थारा नाही

लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले अथणी येथील सभा न भूतो न भविष्यती आहे. भाजपच्या नेत्यांना कर्नाटकाचा विकास बघवत नसल्यामुळे ते वारंवार राज्य सरकारवर खोटे आरोप करीत  आहेत. आम्ही दिलेली 165 पैकी 150  आश्‍वासने पूर्ण केली आहेत.  भाजपचे परिवर्तन म्हणे जेलला जाण्यासाठी का? असा सवाल त्यांनी केला. आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस मजबूत होत आहे. गुजरातमध्ये राहुल गांधींनी  एकट्याने प्रचार केल्यानंतर मोदी व अमित शहांना घाम सुटला होता, असेही खर्गे म्हणाले.    यावेळी प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर  यांनीही विचार मांडले. श्यामराव पुजारी, डॉ. सविता पुजारी, सदाशिव बुटाळे, अस्लम नालबंद, किरण पाटील, गजानन मंगसुळी, अनिल सुनधोळी, एस. एम. नाईक, महेश कुठमळ्ळी आदी उपस्थित  होते.