Tue, Nov 20, 2018 18:59होमपेज › Belgaon › कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच ?

कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच ?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

भाजपने स्वबळाचा नारा देत कर्नाटक काँग्रेसमुक्त करत 150 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मात्र, सी-फोर या खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचे भाजपचे स्वप्न भंगणार असल्याचा अंदाज आहे. 126 जागा मिळवून काँग्रेस सत्तेवर कायम राहील, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे.

सी-फोर संस्थेचे हे गेल्या सहा महिन्यांतील तिसरे सर्वेक्षण आहे. आधीच्या सर्वेक्षणांमध्येही काँग्रेसच सत्तेवर राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

राज्यात सर्वाधिक 126 जागा काँग्रेसला मिळतील. त्याखालोखाल भाजपला 70, निजदला 27 व एका अपक्ष निवडून येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्याच्या विधानसभेत काँग्रेसच्या 122, भाजपच्या 43 आणि निजदच्या 37 जागा आहेत. सात निजद आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तर इतर आमदार म. ए. समिती, बीआर काँग्रेस, अपक्ष असे आहेत. 

ताज्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या  जागा 43 वरून 70 पर्यंत वाढतील. पण त्या त्यांना सत्तेपर्यंत नेऊ शकणार नाहीत. तर निजदच्या जागा तब्बल 17 ने कमी होऊन 44 वरून 27 पर्यंत पोहोचतील.

काँग्रेस, भाजप मतदान टक्का वाढ

राज्यात सर्वाधिक 46 टक्के मतदान काँगे्रसला होईल. गेल्यावेळेपेक्षा काँग्रेसची मते 9 टक्क्यांनी वाढतील. तर भाजपची मते तब्बल 11 टक्क्यांनी वाढून 20 वरून 31 टक्क्यांवर पोहोचतील. निजदची मते मात्र 16 वरून 12 टक्क्यांवर पोहोचतील. मुस्लिम व दलित मते निजदपासून दूर जाण्याचा हा परिणाम असेल, असे सर्वेक्षण अहवालात म्हणण्यात आले आहे.  जुन्या म्हैसूर भागात काँग्रेसला सर्वाधिक 33 जागा तर भाजपला मध्य कर्नाटकात 13 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. किनारपट्टी भागात भाजप व काँग्रेसमध्ये चुरस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
 


  •