Wed, Apr 24, 2019 02:07होमपेज › Belgaon › दोन परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द 

दोन परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द 

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:29AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात 23 मार्च ते 6 एप्रिलअखेर होणार्‍या दहावी परीक्षेसाठी  निपाणी रेंजमधील निपाणी शहरातील दोन केंद्राची मान्यता प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामध्ये म्युनिसीपल हायस्कूल व कन्या शाळा या केंद्रांचा समावेश आहे. प्रतिवर्षी निपाणी रेंजमधील 13 केंद्रांवर  होणारी परीक्षा यंदा 11 केंद्रांवर चालणार आहे.

दोन केंद्रांची मान्यता रद्द केल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. निपाणी रेंजमधील एकूण 52 माध्यमिक शाळांतील 3956 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये 2020 मुले तर 1936 मुलींचा समावेश आहे. परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे.

यंदा परीक्षार्थींना केंद्रावर खासकरून परीक्षा दिल्यानंतर भोजनाचा आस्वाद दिला जाणार आहे. सध्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास  न होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन आरोग्यधिकार्‍यांसह एका कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

निपाणीतील के.एल.ई.इंग्लिश मीडियम स्कूल, मराठा मंडळ, व्हीएसएम, विद्यामंदिर या चार स्कूलसह परिसरातील कोगनोळी, बेनाडी, कारदगा, बोरगाव, सदलगा, गळतगा, बेडकिहाळ या स्कलूच्या एकूण 165 ब्लॉकमध्ये परीक्षेची सोय करण्यात आली आहे. एका रूममध्ये 24 परीक्षार्थी परीक्षा देणार असून एका केंद्रासाठी 13 सुपरवायझरची सोय केली आहे. एकूण 175 मुख्याध्यापक व शिक्षक मिळून परीक्षेचे कामकाज पाहणार आहेत.

चिकोडी शैक्षणिक विभागाचे उपनिर्देशक मुत्तापा दासर यांच्या नेतृत्त्वाखाली दोन स्वतंत्र भरारी पथके, चिकोडी व निपाणीचे तहसीलदार यांचे स्वतंत्र पथक परीक्षांवर लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच निपाणीचे सीपीआय मुत्ताणा सरवगोळ यांच्या मागर्दशनाखाली 50 पोलिस परीक्षा काळात बंदोबस्ताचे कामकाज पाहणार आहेत.

दि. 23 रोजी मराठी, 26 रोजी गणित, 28 रोजी इंग्रजी, 2 एप्रिल रोजी विज्ञान, 4 रोजी कन्नड तर 6 रोजी समाजशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे.