बेळगाव : अखेर रमेश जारकीहोळीच जिल्ह्याचे पालकमंत्री

Last Updated: Jun 02 2020 3:40PM
Responsive image
रमेश जारकीहोळी


बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांची जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. तसा आदेश कर्नाटक सरकारचे आधीन सचिव सौभाग्य यांनी काढला आहे. आपण येत्या शुक्रवारी अधिकृतरित्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्विकारणार आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी दैनिक पुढारीला सांगितले.

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जिल्ह्यातीलच मंत्र्याकडे देण्याचा प्रघात गेल्या दोन दशकांपासून कायम आहे. परंतु भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हुबळी-धारवाडचे आमदार व राज्याचे अवजड उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे गेले. हे पद जिल्ह्याला मिळणार की नाही याबद्दल सातत्याने तर्कवितर्क लढवले जात होते. जिल्ह्याला पालकमंत्रिपद हुकले, असे मध्यंतरी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी स्वतःहून आपल्याला हे पद हुकले नसून आपण स्वतःहूनच जगदीश शेट्टर यांच्याकडे सोपवावे असे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे या वादावर पडदा पडला होता. परंतु, आता अचानक रमेश जारकीहोळी यांच्याकडे पालकमंत्र्यांची धुरा आल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या समवेतच हासनचे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. जी. गोपालय्या यांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे सदर आदेशात नमूद केले आहे.