Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Belgaon › अण्णाभाऊ साठे संमेलन उद्यापासून

अण्णाभाऊ साठे संमेलन उद्यापासून

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:39AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी   
आठवे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन शनिवार दि.16 रोजी मराठा मंदिरात होणार आहे. रविवारी सायंकाळी समारोप होईल.
शनिवारी सकाळी 9 वा. छ. शिवाजी उद्यानापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीची  कॉ.गोविंद पानसरे नगरी,  मराठा मंदिर येथे सांगता होईल. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेेेश देवी, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संज्योत बांदेकर तर अध्यक्षस्थानी इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबादच्या डॉ. माया पंडित 
असतील. 
दु. 2.30 ते 4 पर्यंतच्या पहिल्या सत्रात ‘माझी मैना गावावर राहिली? एक चिकित्सा’ या विषयावर परिसंवाद आहे. मालोजीराव अष्टेकर, दीपक दळवी वक्ते असतील.
सायंकाळी 4.30 ते 6 च्या दुसर्‍या सत्रात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत  डॉ. भालचंद्र कांगो असतील. सायंकाळी 6.30 वा. तिसर्‍या सत्रात शाहीर सदाशिव निकम (कोल्हापूर), शाहीर शीतल साठे (सातारा), यांच्यासह स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम 
होणार आहे. 
रविवार दि.17 रोजी  सकाळी 9.30 ते 11 पर्यंतच्या चौथ्या सत्रात  ‘कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून श्रमिकांच्या लढ्यांना मिळणार्‍या प्रेरणा’ या विषयावर परिसंवाद होईल. यावेळी वक्ते म्हणून पुणे येथील ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर, पत्रकार   प्रसाद कुलकर्णी उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी प्रा. तानाजी ठोंबरे (बार्शी) असतील. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंतच्या पाचव्या सत्रात ‘कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वर्ग व जात, जाणिवा’  या विषयावर परिसंवाद होईल. वक्‍ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर (मुंबई), डॉ. अच्युत माने (निपाणी) असतील. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अप्पर पोलिस महासंचालक उध्दव कांबळे असतील. त्यानंतर 2.30 ते 4 पर्यंतच्या सहाव्या सत्रात प्रातिनिधिक कवींचे संमेलन होईल. वीरधवल परब (वेंगुर्ला), डॉ.अनुजा जोशी (गोवा), फेलिक्स डिसोझा (वसई), गणेश विसपुते (पुणे), डॉ. सुनंदा शेळके (जयसिंगपूर) हे कवी सहभागी होणार आहेत. 
दुपारी 4.30 वा. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. माया पंडित असतील. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.गणेश देवी उपस्थित राहतील.
संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मार्गदर्शक .कृष्णा मेणसे, स्वागताध्यक्षा प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी केले आहे.

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात स्थानिक कवींचे काव्यसंमेलन

बेळगाव : प्रतिनिधी

शहरात होणार्‍या कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला स्थानिक कवींचे काव्यसंमेलन रंगणार आहे. यामध्ये सुमारे 30 हून अधिक कवी सहभागी होणार आहेत. सदर कविसंमेलन शुक्रवार दि. 15 रोजी सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत होणार आहे.

साठे साहित्य संमेलन 16 व 17 रोजी येथील मराठा मंदिरात होणार आहे. अध्यक्षपदी डॉ. माया पंडित राहणार असून उद्घाटन डॉ. गणेशदेवी यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनात तीन परिसंवाद असून यामध्ये स्थानिकांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. 

संमेलनात निमंत्रितांचे कविसंमेलन शनिवारी पार पडणार आहे. यामध्ये निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. परंतु, स्थानिक कविंना संमेलनात सहभागी होता यावे, यासाठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मराठा मंदिर येथे कविसंमेलन आयोजित केले आहे.

कॉ. गोविंद पानसरे प्रेरित कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने आजवर महाराष्ट्रातील विविध शहरात पार पडली. परंतु, त्याठिकाणी याप्रकारची कविसंमेलने आयोजित करण्यात आली नव्हती.