Sun, Jul 21, 2019 01:30होमपेज › Belgaon › अ‍ॅड. अनिल बेनके ठरले जायंट किलर

अ‍ॅड. अनिल बेनके ठरले जायंट किलर

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:59AMबेळगाव : प्रतिनिधी

धार्मिक मुद्द्यावर मते मागितली जाऊ नयेत, असे कितीही आदर्शवादी विचार निवडणूक आचारसंहितेत मांडण्यात आले असले तरी धार्मिक मुद्दा लोकांच्या जीवनापासून वेगळा करता येत नाही. रोजच्या जीवनात माणूस धर्माला महत्त्व देतोच. त्याचे प्रतिबिंब निवडणुकीवर पडणार नसेल तरच नवल. ते बेळगाव उत्तर मतदारसंघात पडले. कारण गेल्या सहा वर्षांत हिंदू-मुस्लिम दंगलींनी पिचलेल्या मतदारांनी यंदाच्या निवडणुकीतून बदल घडवण्याचा चंग बांधला होता, हे स्पष्ट होतेच. ते मतमोजणीतून सिद्ध झाले आणि पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणारे अ‍ॅड. अनिल बेनके जायंट किल्लर ठरले. त्यांनी दोन वेळचे आमदार फिरोझ सेठ यांची हॅटट्रिक हुकवली.

गेली सहा वर्षे बेळगाव शहरात जातीय-धार्मिक दंगलींनी पुन्हा डोके वर काढले होते. 2012 पासून जो दोन गटांत तणाव सुरू झाला, त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर झाला होता-आहे. इतका की शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, खडक परिसरात लग्न करून मुली देण्यासही लोक घाबरू लागले, भाडेकरू घरे सोडून जाऊ लागले. दंगलींमुळे सामान्य माणूस पिचला होता. अगदी गेल्या डिसेंबर महिन्यांतही या परिसरात दंगल माजली. पोलिसांनी दोन्ही समुदायांच्या युवकांवर कारवाई केली खरी. पण सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार फिरोझ सेठ असल्याने एका समुदायावर कठोर कारवाई झाली, तर दुसर्‍या समुदायाबाबत ढिलाई दाखवली गेली, असा आरोप झाला. त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होणार होताच. तो झाला.

सेठ सलग दोन वेळा आमदार झाले. त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात कधीच भाषा किंवा धर्मावरून भेद केला नाही, असे सारेच म्हणतात. जो कोणी त्यांच्याकडे मदतीसाठी गेला, त्याला त्यांनी कधीच रिक्त हाताने पाठवले नाही. पण तेच तत्त्व त्यांच्या जवळच्या समर्थकांनी पाळले असे म्हणता येत नाही. कारण बेळगाव उत्तर मतदारसंघात सर्वात जास्त मुस्लिम मतदार आहे. त्यामुळे फिरोझ सेठ आमदार होणे आणि या मतदारसंघात दंगली वाढणे हा योगायोग नव्हता. या दंगलींशी सेठ यांचे नाव कधीच जोडले गेले नाही, उलट दंगलकाळात त्यांनी शांतताच राखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही समान न्याय मिळाल्याची भावना सर्व समुदायांमध्ये नव्हती. 

मराठी मते निर्णायक
गेल्या निवडणुकीत सेठ यांना 43 हजार मते मिळाली होती, तर दुसर्‍या क्रमांकावर राहिल्या म. ए. समितीच्या रेणू किल्लेकर यांना 27 हजार मते मिळाली होती. तिसर्‍या क्रमांकावर भाजपचे किरण जाधव होते. त्यांनी सुमारे 16 हजार मते मिळवली होती. थोडक्यात दोघांच्या मतांइतकी मते एकट्या सेठनी मिळवली होती.

यंदा हे चित्र बदलण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला होता. म. ए. समितीचा सक्षम उमेदवार उत्तरमधून लढत नव्हता. त्यामुळे आणि अनिल बेनके स्वतः मराठी भाषिक असल्यामुळे सेठ यांना पाडण्याचा निर्धार करून मतदारसंघातील जवळपास सारी मराठी शक्ती बेनकेंच्या मागे उभी राहिली.त्याचाच परिणाम म्हणजे बेनकेंची मते 79 हजारांवर पोचली आणि सेठ यांचीही मते वाढली तरी ते 61 हजारांपर्यंत पोचू शकले. यात महत्त्वाचा आकडा आहे तो बंडखोर उमेदवार आणि पर्यायाने समितीचे उमेदवार ठरलेले बाळासाहेब काकतकर यांना मिळालेल्या 1857 मतांचा. 

ज्या गटाने 2013 च्या निवडणुकीत 27 हजार मते मिळवली होती, त्या गटाची मते यंदा केवळ दोन हजारांपर्यंत मर्यादित राहिली. मराठी भाषिकांनी निर्धारपूर्वक अ‍ॅड. बेनकेंना केलेल्या मतदानाचा हा परिपाक आहे. प्रचाराची वेळीच त्याची चुणूक दिसली होती. काकतकर यांना शिवाजी नगर, चव्हाट गल्ली भागातून, पोलिसांच्या लाठ्या आमच्या पाठीवर पडत असताना तुम्ही कुठे होता, असे प्रश्न विचारून मराठी भाषिकांनी परत पाठवले होते. तेव्हाच सेठ यांना हादरा बसला होता.

मराठी भाषिक एकत्र आले तर काय करू शकतात, याचे प्रत्यंतर बेळगाव उत्तरच्या निकालातून मिळाले आहे. ते मराठीविरोधी मतदान नाही, तर ते रोजचे जगणे सुकर करण्यासाठी झालेले मतदान आहे. ते मराठीसाठी आणि हिंदुत्वासाठी झालेले मतदान आहे. प्रत्येकवेळी पोलिसांची लाठी मराठी मुलावरच पडते, हे बदलण्यासाठी झालेले मतदान आहे. थोडक्यात ते अन्यायाविरुद्ध झालेले मतदान आहे. असा अन्याय बेळगावच्या इतर मतदारसंघातही होत असेल. मराठी नेतृत्त्वाने तो आता समजून घेण्याची वेळ आलेय, हेच बेळगाव उत्तरच्या निकालातून दिसते.

पाकिस्तान जिंदाबाद

दरवर्षी निघणार्‍या टिपू सुल्तान जयंतीच्या मिरवणुकीत काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. त्याची पुनरावृत्ती यंदा प्रचाराच्या दरम्यान झाल्याचे व्हिडियो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले. कृत्य एकाने केले असले, तरी ते कुणाच्या जीवावर केले हेही महत्त्वाचे. त्यामुळे त्याचाही फटका सेठ यांना बसला.

बेनके सर्वमान्य
खरंतर अ‍ॅड. अनिल बेनके भाजपकडून लढले असले तरी त्यांचे नेतृत्त्व जवळपास सर्वमान्य आहे. कुठल्याही समुदायाशी किंवा भाषिकाशी त्यांचे वैरत्त्व नाही. सार्‍यांशी जवळीकच आहे. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी ती साध्य केली आहे. तरीही 2013 मध्ये ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द केली गेली. ती रद्द केली नसती तर तेव्हाच त्यांनी सेठ यांचा पराभव केला असता का, असा विचार आता भाजप करत असेल. पण यंदा भाजपने ती चूक दुरूस्त केली. आणि त्या दुरुस्तीला पाठबळ मिळाले ते मराठी भाषिकांचे.