होमपेज › Belgaon › आम्हाला काम मिळालेच पाहिजे

आम्हाला काम मिळालेच पाहिजे

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:10PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

रोहयोतर्गत जॉबकार्ड देण्यात आले आहे. मात्र काम देण्यात येत नसल्याने आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्यांसह जॉबकार्डधारक महिलांनी तालुका पंचायत कार्यालयावर बुट्टी, कुदळ, फावड्यासह मोर्चा काढून त्वरित काम देण्याची मागणी केली. याबाबत तालुका पंचायत अधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले. 

सरकारकडून रोहयोंतर्गत जॉबकार्डधारकांना कामाची कमी नाही, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कामाची मागणी करीत तालुका पंचायतीवर मोर्चा काढण्याचे प्रकार घडत आहेत. शासनाकडून जॉबकार्डधारकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेकवेळा मागणी करूनही काम दिले जात नसल्याबद्दल जॉबकार्डधारकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
आंबेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या आंबेवाडी, गोजगा, मण्णूर या गावांमधील जॉबकार्डधारक महिलांना काम दिले जात नसल्याबद्दल सदर महिलांनी तालुका पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. आम्हाला काम मिळालेच पाहिजे, कामासाठी निधी वितरित केलाचा पाहिजे, अशी मागणी करत महिलांनी जोरदार आंदोलन केले. 

अधिकार्‍यांकडून ग्रा. पं. सदस्यांची दिशाभूल केली जात आहे. सदस्यांकडून दिलेल्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यास अधिकारी खो घालत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये 14 व्या वित्त आयोगातील निधींतर्गत विकास कामे हाती घेण्यात आले आहेत. यावेळी ग्रा. पं. सदस्य आप्पाजी नाईक, प्रकाश मंडोळकर, सुधीर काकतकर, अरुण कदम, विठ्ठल सुळगेकर, स्मिता तोरे, श्रद्धा चौगुले, अन्नपूर्णा कदम यांच्यासह जॉबकार्ड महिलाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.