होमपेज › Belgaon › ...अन् तिची अखेरची इच्छा झाली पूर्ण 

...अन् तिची अखेरची इच्छा झाली पूर्ण 

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 12:53AMखानापूर : प्रतिनिधी

दुर्धर आजाराने जगणे नकोसे झालेल्या अन् मृत्यूची वाट बघणार्‍या गवाळीच्या रुक्मिणी वासुदेव गुरव या महिलेचे गुरुवारी निधन झाले. वर्षभर दवाखान्यात शक्य ते सर्व उपचार करुनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे तिच्या इच्छेवरुन तिला गवाळी येथील तिच्या घरी हलविण्यात आले होते. अखेरचा श्‍वास कुटुंबाच्या उपस्थितीत घ्यावा ही तिची अखेरची इच्छा जरी पूर्ण झाली असली तरी यानिमित्ताने तालुक्याच्या दुर्गम भागातील जनतेच्या दुर्भाग्याचे दशावतार समोर आले आहेत.

दोन वर्षापूर्वी रुक्मिणी कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून हलाखीच्या परिस्थितीतही तिच्या उपचारासाठी कुटुंबियांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. रुक्मिणीचा पती वासुदेव महादेव गुरव महसूल विभागात ग्रामसहाय्यक म्हणून काम करतो. त्यामुळे ओळखीच्या अधिकार्‍यांची मदत घेऊन शासकीय दवाखान्यातून शक्य तेवढे उपचार करण्यात आले. मात्र रुक्मिणीची प्रकृती अधिकच खालावल्याने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने अखेर मृत्यूची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.

अखेरच्या घटका मोजत असलेल्या रुक्मिणीने अखेरचे काही दिवस तरी चिमुकल्यांसोबत घालावे, या उद्देशाने आपल्याला घरी न्या. मी अखेरचा श्‍वास माझ्या घरीच घेईन. अशी इच्छा प्रकट केल्याने गेल्या आठवड्यात तिला गवाळीला नेण्यात आले. धुवांधार पावसात गावचा संपर्क तुटल्याने दहा की. मी. पायपीट करुन ग्रामस्थांनी बांबूच्या डोलीतून अत्यव्यस्थ रुक्मिणीला घरी नेले होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत रुक्मिणीला घरी नेतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुकाभर या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली होती. गुरुवारी पहाटे रुक्मिणीने गावातील घरात अखेरचा श्‍वास घेतला. तिच्या पश्‍चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या दुर्देवी घटनेतून तरी शहाणपण घेऊन गवाळी गावच्या समस्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.