Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Belgaon › भर पावसातच दोन तास ठिय्या

भर पावसातच दोन तास ठिय्या

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:37PMबेळगाव : प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी भर पावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दोन ते अडिच तास ठिय्या मारला. जिल्हाधिकारी एस. झियाऊला यांनी स्वत: गेट जवळ येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले तरीही आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनास वाट करुन दिली नाही. यामुळे त्यांना मागील दरवाजाने दुसर्‍या वाहनातून बाहेर जावे  लागले. महिला बालकल्याण अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

केंद शासनाने मुलांच्या खात्यावर प्रति महा 158 रुपये पोषण आहार भत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, तो रद्द करण्यात यावा, अंगणवाडीतील मुलांना शाळेमध्ये एलकेजी, युकेजीसाठी प्रवेश द्यायचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो रद्द करावा, अंगणवाडी सेविकांना किमान वेतन 18 हजार रुपये करण्यात यावे, बालविकास समितीमुळे राजकीय हस्तक्षेप वाढतो, तो रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. 

पावसाला रिमझिम सुरुवात झाली असतानाच हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थडकला. पोषण आहार भत्ता थेट मुलांच्या खात्यावर जमा केल्याने याचा लाभ मुलांना होईल का नाही, हे सांगता येत नाही. या निधीचा इतर कुटुंबच वापर करतील आणि मुले मात्र पोषण आहारापासून वंचित राहतील. मुलांना शाळेतील बालवाडीत प्रवेश दिल्यास देशभरातील सुमारे 24 लाख अंगणवाडी सेविकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. बालविकास समितीमध्ये राजकीय लोक असल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढून कामात भेदभाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्यात यावी. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नेत्यांकडून देण्यात आला. 

रिमझिम पावसातच अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. यानंतर जिल्हाधिकारी एस. झियाउला यांनी स्वत: गेटसमोर येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. तुमच्या भावना शासनाला तात्काळ कळविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मात्र अंगणवाडी सेविकांनी आपले ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. यानंतर महिला बालकल्याण अधिकार्‍यांच्या प्रतिनिधीने निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

मोर्चाची सुरुवात चन्नम्मा चौकातून करण्यात आली. आंदोलनामध्ये अध्यक्षा दोडम्मा पुजारी, कार्याध्यक्षा जी. एम. जैनखान, गोदावरी राजापुरे, सरस्वती माळशेट्टी, पार्वती सालीमठ आदी सहभागी झाले होते.