होमपेज › Belgaon › लढा आरक्षणाचा, इशारा सीमाबांधवांचा 

लढा आरक्षणाचा, इशारा सीमाबांधवांचा 

Published On: Jul 31 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 8:51PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सुरू असणार्‍या मराठा ठोक मोर्चा आंदोलनाचा व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शासनाकडूनआरक्षण जाहीर करण्यास दाखविण्यात येणारी उदासीनता मराठा समाजाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरत आहे. याचे पडसाद रविवारी शिनोळी येथे उमटले. बेळगावकर आणि चंदगडकर मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन सीमाप्रश्‍नाबरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. यामुळे आंदोलन प्रभावी ठरले.

वर्षभरापासून मराठा समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने छेडली आहेत. यापूर्वी शिस्त आणि संयम याचे दर्शन घडवत देशभरात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची दखल देशपातळीवर घेण्यात आली. न्याय हक्‍क मागण्यासाठी लाखोंच्या संख्येने 58 मोर्चाच्या माध्यमातून एकवटलेल्या मोर्चाची प्रशासनाने दुर्दैवाने दखल घेतली नाही.परिणामी आजवर शिस्तीचे प्रदर्शन घडवणार्‍या मराठा समाजाने ठोक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन व्यापक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याचे पडसाद पंधरा दिवसापासून उमटताना दिसून येत आहेत.

सीमाभागात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मराठा  अधिक संख्येने आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडीचे पडसाद सीमाभागात उमटतात. यातूनच मागील वर्षी 10 लाखाहून अधिक गर्दीचा मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. त्याला मिळालेला प्रतिसाद अचंबित करणारा होता. यातून मराठा समाजात धुमसत असणारा असंतोष प्रकट झाला होता. त्यानंतर रविवारी चंदगड तालुक्याच्या सीमेवरील शिनोळी येथे आंदोलन छेडण्यात आले. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा लाभ सीमाभागातील 865 खेड्यातील गावांना मिळणार आहे. त्याचबरोबर 40 लाख मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा असणारा सीमाप्रश्‍न मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीमध्ये समाविष्ठ आहे. यामुळे सीमाभागातील मराठा आणि मराठी बांधवाचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

बेळगाव आणि चंदगड तालुक्याचे निकटचे संबंध आहेत. चंदगड तालुका बाजारपेठेसाठी पूर्णपणे बेळगाव शहरावर अवलंबून आहेत. बेळगावातील अनेक मराठी नेते हे मूळचे चंदगड तालुक्यातील आहेत. यामुळे दोन्ही तालुक्याचे सर्वच बाबतीत सलोख्याचे नाते आहे. हे रविवारच्या आंदोलनातून दिसून आले. बेळगावकर-चंदगडकर एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा आणि सीमाप्रश्‍नाचा आवाज बुलंद करण्यात आला.

मराठा लोकप्रतिनिधींची पाठ

बेळगाव, खानापूर, निपाणी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये म. ए. समिती, शिवसेना नेत्यांनी पुढाकार घेतला. परंतु, निवडणूक काळात मतासाठी ‘मराठा’ असल्याचे जाणीव होणार्‍या भाजप, काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे पाठ फिरविली होती. यामुळे समाजबांधवातून नाराजी व्यक्त होत आहे.