होमपेज › Belgaon › निवडणूक कर्मचार्‍यांना वाढीव मानधन

निवडणूक कर्मचार्‍यांना वाढीव मानधन

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 26 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणूक कामकाजासाठी नियुक्‍त करण्यात येणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना चार ते पाच पट आणि इतर कर्मचार्‍यांना 40 ते 50 टक्के मानधनवाढीचा आदेश 24 मे रोजी जारी करण्यात आला आहे.

निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असल्याबद्दल अनेक दिवसांपासून आक्षेप घेतला जात होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने 28 फेब्रुवारी 2014 रोजी याबाबतचे निर्देश दिले होते. निवडणुकीचे काम करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना वाढीव मानधन देण्याची सूचना आयोगाने केली होती. काही दिवसांपूर्वी कनाटक सरकारच्या वाहनचालक संघटना अध्यक्षांनी आयोगाला पत्र पाठविले होते.

महागाईच्या काळात चालकांना मिळणारा 175 रुपयांचा दैनंदिन भत्ता परवडत नाही. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर कोलारच्या जिल्हा निवडणूक अदिकार्‍यांनी 23 एप्रिलला आयोगाला पत्र पाठवून निवडणूक कर्मचार्‍यांना वाढीव मानधन देण्याचे आवाहन केले होते. याचा सकारात्मक परिणाम झाला असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक कामकाजात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना वाढीव मानधन मिळणार आहे. राज्य सरकारने 24 मे रोजी आदेश जारी करून वाढीव मानधनासाठी अतिरिक्‍त 30 कोटी रुपये मंजूर करत असल्याचे कळविले आहे. 222 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक झाली आहे. आता आणखी दोन मतदारसंघात निवडणूक होत असून तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही या आदेशाचा लाभ होणार आहे.

वाढीव मानधन असे

संचारी जागृती दल, स्टॅटिक सर्व्हेलन्स पथकाला तीस दिवसांच्या मानधनात 1200 रुपयांवरून 6 हजार रुपये वाढ, मतदान, मतमोजणीदिवशी काम करणार्‍या मतदान अधिकार्‍यांना आणि प्रभारींना 350 वरून 500 रुपये, पोलिंग ऑफिसर, मतमोजणी सहायकांना 250 वरून 350 रुपये, सूक्ष्मनिरीक्षकांना 1000 रुपयांवरून 1500 रुपये, मतदान केंद्र पातळीवरील अधिकार्‍यांना 350 रुपये, ‘ड’ वर्ग कर्मचार्‍यांना 150 रुपयांवरून 200 रुपये, असिस्टंट एक्स्पेंडिचर ऑब्झर्व्हरना 7,500 रुपयांवरून 10 हजार रुपये, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथकाच्या ‘अ’ आणि ‘ब’ अधिकार्‍यांना 1200 वरून 6 हजार रुपये, सहायकांना 1000 रुपयांवरून 5 हजार रुपये वाढीव मानधन मिळणार आहे.वाहनचालकांना याआधी 175 रुपये दैनंदिन मानधन होते. यापुढे त्यांना 250 रुपये मानधन मंजूर केले जाणार आहे.