Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Belgaon › समस्या सोडवण्यात युवकांचे योगदान महत्त्वाचे

समस्या सोडवण्यात युवकांचे योगदान महत्त्वाचे

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:30AM

बुकमार्क करा
 

बेळगाव : प्रतिनिधी

जगात भारतात सर्वाधिक युवकांची संख्या आहे. युवकांनी चिकित्सक बनून ज्ञानार्जन करण्याबरोबर नवनव्या गोष्टींचा शोध घ्यावा. देशासमोर विविध समस्या असून त्या सोडविण्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. अनिल डी. सहस्त्रबुद्धे यांनी केले.  विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या 17 व्या पदवीदान समारंभामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी स्वीकारल्यानंतर प्रमुख वक्‍ते या नात्याने ते बोलत होते. 

देशातील 25 टक्के युवावर्ग विकासासाठी कारणीभूत आहे. सर्व्हे जनः सुखनो भवतू  हा आपला सिद्धांत असून देशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हे अभियांत्रिकीबरोबर वनस्पती शास्त्र, विज्ञान तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या सर्वांशी संबंध ठेवते. त्याची एकमेकाशी सांगड असल्याने त्या द‍ृष्टिकोनातून प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.  अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि कुलपती वजुभाई वाला होते. व्यासपीठावर इस्त्रोचे चेअरमन पद्मश्री किरणकुमार, उच्च शिक्षणमंत्री बसवराज रायरेड्डी, व्हीटीयूचे कुलगुरू डॉ. करिसिद्धाप्पा उपस्थित होते. आजच्या सोहळ्यात 384 जणांना बीआर्क, 4592 जणांना एमबीए, 2542 जणांना एमसीए, 4347 जणांना एमटेक, 15 जणांना एम आर्क, 20 जणांना एमएस्सी आणि 302 जणांना पीएच.डी. देऊन सन्मानित करण्यात आले.