Wed, Apr 24, 2019 01:50होमपेज › Belgaon › युवा मेळाव्यातून झाली वैचारिक घुसळण

युवा मेळाव्यातून झाली वैचारिक घुसळण

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:37PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी माणूस युद्धात जिंकतो आणि तहात हरतो, असा इतिहास आहे. युद्धात जिंकण्यासाठी मनगटाची गरज असते तर तडजोडीसाठी वैचारिक घुसळण महत्त्वाची असते. यासाठी बौद्धिक बैठक सक्षम असावी लागते. नेमकी हीच निकड जाणून ता. म. ए. समितीने युवा मेळाव्यांचे सत्र सुरू केले आहे. किणये येथे रविवारी झालेल्या मेळाव्याने युवक चार्ज झाले असून विविध कारणानी दुभंगलेली मने जोडण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

मागील महिन्यापासून समिती प्रबोधनासाठी मेळावे आयोजित करत  आहे. मेळाव्यामध्ये प्रामुख्याने युवक अपेक्षित असला तरी यामध्ये महिला, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचीही उपस्थिती दिसून येते. परिणामी यातून सर्व थरातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन होत आहे.

सीमाबांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी 62 वर्षापासून झुंज देत आहे. हा लढा हातात भगवा ध्वज आणि मुखात शिवरायांचा जयजयकार यामाध्यमातून सुरू आहे. लढ्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून कार्यकर्त्यांना मिळते. हे नेमकेपणाने हेरून मेळाव्यात सीमाप्रश्‍नाचा जागर, आणि शिवचरित्र या दोन विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवव्याख्याते प्रा. मधुकर पाटील यांनी शिवचरित्राचा धागा पकडून मराठी तरुणांचा स्वाभिमान जागा करण्याचा प्रयत्न केला. मराठी माणूस विकावू नसून टिकावू असल्याचे त्यांनी जोरकसपणे मांडले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमिषांना मराठी माणसांने बळी पडू नये, असे आवाहन केले.

मागील विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीची स्थिती गड आला पण सिंह गेला अशी झाली होती. दोन जागेवर म. ए. समितीला यश मिळाले. परंतु ग्रामीण मतदार संघात निसटता पराभव स्वीकारावा लागला. यामुळे गड येऊन सुद्धा ग्रामीणचा सिंह गमवावा लागल्याची खंत सीमावायिसांना लागून राहिली. याचा नेमका संदर्भ देत मधुकर पाटील यांनी यावेळी गडाबरोबर सिंहालादेखील वाचविण्याचे आवाहन केले.

दिनेश ओऊळकर यांची जडणघडण सीमालढ्याच्या चळवळीत झाली आहे. सीमाप्रश्‍नाच्या न्यायालयीन लढ्यातदेखील ते महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. न्यायालयात लढा सुरू असताना रस्त्यावरची लढाईदेखील आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकेच्छा प्रकट करण्यासाठी निवडणुका हे एक अस्त्र असते. त्याचा प्रभावी वापर सीमाबांधवांनी करावा. यासाठी बुथनिहाय समितीची रचना करण्याबरोबर जनतेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले. याबाबत प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. याचा फायदा समितीला होणार आहे.  मेळाव्यात मांडलेल्या विचारानी युवकांचे प्रबोधन झाले. त्याचबरोबर मरगळ झटकण्याचे काम झाले. यामध्ये सातत्य ठेवण्याची जबाबदारी आगामी काळात नेत्यांना सांभाळावी लागणार आहे.