Tue, Jul 16, 2019 11:45होमपेज › Belgaon › वाघवडेतील युवकाचे खंडणीसाठी अपहरण

वाघवडेतील युवकाचे खंडणीसाठी अपहरण

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 22 2018 12:39AMमच्छे : वार्ताहर

खंडणीसाठी एका युवकाचे अपहरण करून त्याला एक रात्र आणि एक दिवस उसाच्या मळ्यात हात-पाय बांधून ठेवल्याची घटना वाघवडे येथे घडली. अपहरणकर्त्यापैकी दोघांना पकडण्यास ग्रामस्थांना यश आले आहे तर दोन अपहरणकर्ते बेपत्ता आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, ज्योतीनगर-वाघवडे येथील शुभम शंकर बेळगावकर (वय 22) हा नेहमीप्रमाणे रात्री 9 वा. आपल्या घरातून दूध डेअरीमध्ये दूध देण्यासाठी दुचाकीवरून गावात गेला होता. दूध देऊन परत येत असताना दुसर्‍या गल्लीत राहणारा संतोष (वय 20) रस्त्यावर हातात बाटली घेऊन थांबला होता. त्याने शुभमला अडविले व ‘मला पेट्रोल पाहिजे, तुझ्या गाडीवरून गावात जाऊ चल’ असे सांगून त्याला सरळ गावच्या बाहेर मार्कंडेयनगर रस्त्यावर नेले. तेथे दबा धरून बसलेले बसाप्पा, रमेश आणि बसू  या तिघांनी शुभमला ‘तुझ्याकडे काम आहे. शेताकडे चल’ असे सांगून त्याला त्याच्याच दुचाकीवर बसविले आणि संतिबस्तवाडजवळील काळेनट्टी रस्त्यावर एका उसाच्या मळ्यात नेले. मळ्यात त्याचे हातपाय घट्ट दोरीने बांधून त्याला रात्री 10 वा. ऊसमळ्यात सोडून दिले.  शुभम हातपाय सोडून घेण्याचा प्रयत्न करीत होता तसेच जोरजोरात रडत होता. त्याने अपहरणकर्त्यांना माझ्याकडून काय हवे, असे विचारले. त्यावर अपहरणकर्त्या चौघांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. ‘तुझ्या बाबांना सांग. आम्हाला पैसे हवे आहेत, पैसे नाही दिले तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी  देत त्याच्या गळ्याला चाकू लावला. 

धमकीमुळे घाबरलेल्या शुभमने मित्राचा मोबाईल नंबर अपहरणकर्त्यांना दिला.  पण त्यावर संपर्क होऊ शकला नाही.

गावात शोधाशोध

दूध देण्यासाठी गेलेला शुभम बेपत्ता झाल्याने वाघवडेत एकच खळबळ माजली.  सुमारे 40 लोकांनी रात्रभर शोधाशोध  करण्यास सुरुवात केली. सकाळ झाली, तरी शुभम सापडला नाही. शेवटी गावकरी काळेनट्टी गावाकडील रस्त्याकडे गेले असता त्यांना शुभमच्या ओरडण्याचा आवाज आला गावकरी उसाच्या मळ्यात पोचले असता त्यांना शुभम हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. 

गावकर्‍यांनी अपहरणकर्ते बसाप्पा आणि रमेशला पकडून चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांना गावामध्ये आणून  वडगाव ग्रामीण पोलिसाच्या ताब्यात दिले. घटनास्थळी सीपीआय नारायणस्वामी दाखल झाले. त्यांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले तर संतोष व बसू  हे दोघे बेपत्ता आहेत. पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. शुभमचे वडील मुख्याध्यापक असून, पोलिस त्यांच्याकडून माहिती घेत आहेत.