Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Belgaon › युवा आघाडी, तालुका समितीचे मनोमिलन

युवा आघाडी, तालुका समितीचे मनोमिलन

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका म. ए. समितीपासून दुरावलेली मराठी भाषिक युवा आघाडी आणि ता. म. ए. समितीमध्ये मनोमिलन झाले. युवा आघाडीने मध्यवर्ती म. ए. समितीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील मराठी भाषिकांमध्ये एकीची प्रक्रिया जोमाने सुरू आहे. यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. मराठी भाषिक युवा आघाडीने यांनी यासाठी पुढाकार घेऊन तालुका म. ए. समितीला पाठिंबा व्यक्त केला.

कॉलेज रोडवरील मराठी भाषिक युवा आघाडीच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी म्हणाले, दोन संघटनांमधील दुराव्यामुळे मराठी माणूस विभागला जात होता. पर्यायाने यातून मराठी माणसांची हानी होत होती. हे टाळण्यासाठी मराठी भाषिक युवा आघाडीने तालुका म. ए. समितीला विनाअट पाठिंबा व्यक्त केला आहे. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, मराठी भाषिक युवा आघाडीने मराठी भाषिकांचे हित लक्षात घेऊन दिलेला पाठिंबा मराठी माणसामध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नव्हे तर यापुढच्या काळात आम्ही एकीने काम करू.

मराठी भाषिक युवा आघाडीचे प्रवक्ते अरुण कानूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. किणेकर यांनी गडकरी यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. तर गडकरी यांनी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांना पुष्पहार घातला. यावेळी शिवराज पाटील, गीता बस्तवाडकर, भाऊ शहापूरकर, संतोष मंडलिक, मोनेश्‍वर गरग, सरचिटणीस एल. आय. पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

मराठी गटाकडून नवी अट

दरम्यान, तालुक्यातील दुसर्‍या गटाने शनिवारी उमेदवार निश्‍चित करून मध्यवर्तीकडे नाव देण्याचे आश्‍वासन शुक्रवारी झालेल्या एकीच्या बैठकीमध्ये दिले होते. परंतु शनिवारी त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये तालुक्याचा उमेदवार प्रा. एन. डी. पाटील आणि किरण ठाकूर यांच्या संयुक्त बैठकीतून उमेदवार निवडीची नवी अट घालण्यात आली. याबाबतचे पत्र सरचिटणीस मनोज पावशे यांनी सुरेश हुंदरे स्मृतिमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे यांना दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा तालुका म. ए. समितीतील एकीचे राजकारण नवीन वळणावर गेले आहे. 

Tags : Belgaum, Youth, Front, Taluka, Committee, unity