Sat, Jul 20, 2019 15:37होमपेज › Belgaon › निरोगी आयुष्यासाठी योग अत्यावश्यक

निरोगी आयुष्यासाठी योग अत्यावश्यक

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 7:51PMनिपाणी : विठ्ठल नाईक

आधुनिक युगात मानव शारीरिक आणि मानसिक सुख हरवत चालला आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण होण्यासाठी नियमित योग अत्यावश्यक आहे. निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी योग अत्यावश्यक असल्याचे मत योगगुरु शंकर गुरुजी यांनी व्यक्‍त केले.गेल्या 20 वर्षापासून योगाभ्यासाचे धडे देत अनेकांना फलदायी जीवनाचा मंत्र ऋृषी संस्कृती योग केंद्राचे चिकोडी येथील योगगुरु शंकर गुरुजी देत आहेत. 

योग म्हणजे काय?

योग ही एक निरोगी आरोग्याची जीवनपध्दती आहे. त्यातून शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक सुख लाभून आरोग्य निरोगी बनते. धावपळीच्या युगात मानव आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मानसिक स्वास्थ्य हरवत चाललेल्या मानवाला योग अत्यावश्यक आहे.

योगाभ्यासाचे आपणास कोणाकडून मार्गदर्शन लाभले?

आपण बंगळूर येथे पाच वर्षे ऋृषी प्रभाकर गुरुजी यांच्याकडून योगाभ्यास ज्ञात करुन घेतला. राळेगणसिध्दीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनानुसार धारवाड विद्यापीठांतर्गत अभ्याक्रमही सुरु आहे.

योगाच्या माध्यमातून आपण केलेले कार्य?

गेल्या 20 वर्षापासून ऋृषी संस्कृती योग केंद्राद्वारे चिकोडी, रायबाग, अथणी, बेळगाव, बैलहोंगलसह अनेक ठिकाणी योगाचे प्रशिक्षण देत आहोत. विविध गावे दत्तक घेऊन निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे राबविण्यात येतात. रोज सकाळी व सायंकाळी शिबिरांच्या माध्यमातून योग प्रशिक्षण देण्यात येते. शिवायशिबिरे भरवून प्रशिक्षण दिले जाते.

योग दिन हा 21 जून रोजीच का?

21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव संयुक्‍त राष्ट्र संघाच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्‍त राष्ट्र संघाच्या 193 देशांपैकी 175 देशाच्या सहप्रतिनिधींनी त्याला मंजुरी देत  21 जून योग दिन म्हणून साजरा होऊ लागला.

योगाभ्यासातून मिळणारे ज्ञान आणि फायदे कोणते?

योगामुळे शरीर आणि मनात परिवर्तन घडून येते. योगामुळे पाच कोषांचा विकास होतो. अन्यमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष होय. या सर्वांतून मिळणारे ज्ञान हे केवळ दैहिक नसून आत्मिक असते. निरोगी आणि फलदायी आरोग्यासाठी यांचा उपयोग होतो.

योगाचे महत्त्व याबाबत काय सांगाल?

21 व्या शतकात माणूस भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. या धावपळीत त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळत आहे. मानवी शरिर आणि मनावर अनेक रोगांची अतिक्रमणे वाढत असून या सार्‍यांपासून सुटका  होण्यासाठी प्राचीन भारतीय काळापासून चालत आलेली योग विद्येची परंपरा उपयोगात आणून मानवी जीवन संपन्न  करावे.