होमपेज › Belgaon › येळ्ळूर रस्त्याचे नामांतर करण्यास मराठी भाषिकांचा विरोध

येळ्ळूर रस्त्याचे नामांतर करण्यास मराठी भाषिकांचा विरोध

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

येळ्ळूर रस्त्याचे बेकायदेशीर नामांतर करण्याचा प्रयत्न गुरुवारी काही कानडी म्होरक्यांनी केल्यानंतर वडगावमध्ये काही काळ वादंग माजले. मराठी भाषिकांनी बेकायदेशीर नामांतरास विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव न वाढता तूर्त या प्रकारावर पडदा पडला आहे.

वडगावातील सोनार गल्लीच्या कोपर्‍यावर गुरुवारी सकाळी कानडी संघटनेने कानडी भाषेत रस्ता नामांतराचा फलक उभारला. येळ्ळूर रस्त्याला ‘देवरदासीमय्या’ रस्ता असे नाव देण्यात आले होते. हे नामकरण करण्याची मागणी कन्‍नड संघटनेकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. गुरुवारी देवरदासीमय्या यांची जयंती होती. हा मुहूर्त साधून नामांतराचा कानडी भाषेतील फलक उभारण्यात आला. 

फलक उभारल्याची माहिती मराठी भाषिकांना कळताच वडगाव भागातील मराठी नगरसेवकांसह मराठी कार्यकर्त्यांनी लागलीच फलकाकडे धाव घेतली. अचानक फलक उभारण्याचा प्रकार बेकायदेशीर असून, याबाबत महानगरपालिकेमध्ये कोणताही ठराव झालेला नसल्यामुळे हा फलक त्वरित हटवावा, अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली. त्यावेळी कन्‍नड आणि मराठी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

पोलिसांकडे तक्रार..

काही मराठी भाषिकांनी शहापूर पोलिस स्थानकात  धाव घेऊन या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली. हा प्रकार बेकायदेशीर असून यातून भाषिक ऐक्य धोक्यात येऊ शकते.  त्यामुले सदर फलक त्वरित हटवावा अशी मागणीही केली.

परवानगीची तपासणी

पोलिसांनी कानडी संघटनांच्या म्होरक्यांना पाचारण करून त्यांच्याकडे फलक उभारणीच्या परवानगीची मागणी केली. कानडी म्होरक्यांनी आपल्याकडे परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सदर फलक गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत हटविण्याची सूचना कानडी म्होरक्यांना दिली. त्याला कानडी म्होरक्यांनी होकार दिल्यानंतर मराठी भाषिक माघारी परतले.त्यानंतर पोलिसांनीच सदर फलक दुपारी तीनच्या सुमारास हटविला. यामुळे रस्ता नामांतर प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगावर तूर्त पडदा पडला.

माजी महापौर महेश नाईक, आप्पासाहेब पुजारी, माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक अनिल मुचंडीकर, विजय भोसले, रतन मासेकर,  राजू मरवे, राजू बिर्जे यांच्यासह राजू पावले, नितिन खन्नूकर, गजानन होसूरकर, किरण पाटील, प्रभाकर अवचारे आदीसह वडगाव, भारतनगर, शहापूर भागातील मराठी भाषिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. 

 

Tags : belgaon, belgaon news, Yellur, Yellur road name change, marathi people, Oppose,