Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Belgaon › येडिंचा राजीनामा; भाजपची नामुष्की 

येडिंचा राजीनामा; भाजपची नामुष्की 

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:20AMबंगळूर : पीटीआय/वृत्तसंस्था

अखेर बी. एस. येडियुराप्पा कर्नाटकचे तीन दिवसांचेच मुख्यमंत्री ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच येडियुराप्पांनी राजीनाम्याची घोषणा करीत सभागृह सोडले. शनिवारी कर्नाटकच्या विधानसभेत होणार्‍या भाजप सरकारच्या शक्‍तीपरीक्षेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्ष लढाईपूर्वीच तलवार म्यान करीत मुख्यमंत्री येडियुराप्पांनी मैदान सोडले आणि भारतीय जनता पक्षावर नामुष्की ओढवली. दरम्यान, सायंकाळी सात वाजता निजदचे विधिमंडळ पक्षनेते कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. कुमारस्वामी यांचा बुधवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपच्या सर्व गृहीतकांना आणि समीकरणांना धक्‍का बसला होता. काँग्रेस आणि निजदचे आमदार एकमताने सभागृहात उपस्थित राहिल्यामुळेच बहुमत चाचणीत नापास होण्याची नामुष्की ओढविण्याआधीच येडियुराप्पा पदावरून पायउतार झाले. दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी शपथ घेतील. राज्यपालांचे निमंत्रण आल्यानंतर आपण सरकार स्थापन करू, अशी प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली. 

राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी दिल्यानंतर काँग्रेस-निजदने निकालानंतर 15 मे रोजी निकालाच्या मध्यरात्रीच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयानेही येडियुराप्पांना 15 दिवसांऐवजी 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, येडियुराप्पा यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 

222 जागांसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान झाले. 15 रोजी निकाल जाहीर झाला. भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या. काँग्रेसला 78, निजदला 38 जागा, तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सरकार स्थापन करण्यासाठी लागणारा 112 हा जादूई आकडा गाठण्यात कोणत्याच पक्षाला यश आले नाही. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने विधानसभा त्रिशंकू राहिली होती.

निकालादिवशीच दुपारी काँग्रेसने निजदला बिनर्शत पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर निजदने अपक्षांसह 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. राज्यपाल वजुभाई वाला यांनी मात्र सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलाच 16 मे रोजी रात्री दहा वाजता सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण केले होते. राज्यपालांंनी येडियुराप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. 

राज्यपाल निर्णयाला आव्हान

राज्यपालांच्या या निर्णयाला काँग्रेसने मध्यरात्रीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत साडेतीन तास सुनावणी सुरू होती. न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार देत शुक्रवारी सकाळी पुन्हा सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान मात्र सर्वोच्च न्यायालयाने येडियुराप्पा यांना 15 दिवसांऐवजी 24 तासांत अर्थात शनिवारी सायंंकाळी चार वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.
 

सरकार टिकविण्यासाठी गरज होती फक्‍त सात आमदारांची

बहुमत चाचणी सायंकाळी असल्याने काँग्रेस आणि निजदने आपापल्या आमदारांना हैदराबाद येथील रिसॉर्टवर अतिशय गोपनीयरीत्या नेले होते. काँग्रेस आमदार आनंदसिंग कालपासून बेपत्ता होते. भाजपने त्यांचे अपहरण केल्याची चर्चा होती. मात्र, येडियुराप्पा यांनी भाषणास प्रारंभ करण्याच्या काही मिनिटे आधी ते सभागृहात दाखल झाले. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखविणारी ध्वनिफीतही काँग्रेसने शुक्रवारी रात्री जारी केली होती. भाजपला सरकार टिकवण्यासाठी फक्‍त सात आमदारांची गरज होती. पुरेसे संख्याबळ जमविण्यात अपयश आल्याची खात्री होताच आठवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या 75 वर्षीय  येडियुराप्पायांनी लढण्याआधीच तलवार म्यान केली.

150 पेक्षा जादा जागा जिंकून परत येईन : येडियुराप्पा

बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला 101 टक्के बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा करणार्‍या येडियुराप्पायांनी सभागृहात काँग्रेस-निजदचे संख्याबळ बघताच राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना ते भावूकही झाले होते. सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

कर्नाटक विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाताच येडियुराप्पाभाषणासाठी उभे राहिले. यावेळी जनतेने काँग्रेस आणि निजदला नाकारत भाजपला कौल दिला. मात्र, आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक आमदारांचे पाठबळ नाही. त्यामुळे पुन्हा 150 हून अधिक आमदार घेऊनच सभागृहात येईन. आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 28 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. दरम्यान, शेतकरी आणि कष्टकरी लोकांसाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

नामुष्कीच्या भीतीनेच राजीनामा

सकाळपर्यंत भाजपची सरकार स्थापन करण्याबाबत मोर्चेबांधणी सुरूच होती; पण दुपारी शपथविधी झाल्यानंतर मात्र भाजप श्रेष्ठींच्याही आशा मावळल्या. दरम्यान, बहुमताचा आकडा गाठण्यात आपण अपयशी ठरल्याची जाणीव झाल्यानंतर बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा आधीच राजीनामा देऊ, असे येडियुरप्पांनी भाजपश्रेष्ठींना कळवल्याचे समजते.

राज्यघटना, कायदाच श्रेष्ठ : सिद्धरामय्या

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी-शहा यांचे वर्तन हिटलरसारखे असून, ते गोबेल्सनीतीचे कट्टर प्रचारक आहेत, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या कोणत्याही डावपेचांना आमचे आमदार बळी पडले नाहीत, याचा मला अभिमान आहे. राज्यपालांसह घटनात्मक संस्था प्रभावित करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राज्यघटना आणि कायदा हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे कर्नाटकातील घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. 

न्यायालयामुळेच घोडेबाजाराला चाप बसला : गुलाम नबी आझाद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादही बहुमत चाचणीवेळी सभागृहातील गॅलरीत उपस्थित होते. राजीनाम्यानंतर येडियुराप्पायांनी त्यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. न्यायालयामुळेच या निवडणुकीतील घोडेबाजाराला आळा बसण्यास मदत झाली. हा एकप्रकारे लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली.