Thu, Apr 25, 2019 18:32होमपेज › Belgaon › सचिवपदाच्या राजीनाम्यावर ठाम

सचिवपदाच्या राजीनाम्यावर ठाम

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:53PMबंगळूर : प्रतिनिधी 

युती सरकारात पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आपणाला स्थान देण्यात न आल्याच्या असंतोषातून एच. के. पाटील नेतृत्वातील असंतुष्ट गटाने मंगळवारी दुसर्‍या फेरीत बैठक घेऊन चर्चा केली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी  अ. भा. काँग्रेस सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. आपण निर्णयाशी ठाम असून राजीनामा कदापि मागे घेणार नाही, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले

पक्षश्रेष्ठींच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून एच. के. पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी असंतुष्ट आमदारांची बैठक झाली. अ. भा. काँग्रेसचे सचिव मणिकंठ ठाकुर, पी.सी. विष्णुनाथ यांनी एच.के. यांच्या निवासस्थानी जाऊन आमदारांशी सल्लामसलत केली.  पुढील टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान तर काहींना महामंडळ अध्यक्षपद देण्याबाबत सांगितले असल्याचे समजते.

आ. ईश्वर खंड्रे, सुब्बारेड्डी, शरणबसप्पा दर्शनापूर, डॉ. उमेश जाधव, वरिष्ठ सभागृहाचे सदस्य जी. सी. चंद्रशेखर यांनी एच. के. पाटील यांच्या निवासस्थानाला भेट देऊन चर्चा केली. दरम्यान, विजापूरला गेलेले एम. बी. पाटील मंगळवारी सायंकाळी बंगळूरला परतले आहेत. जलसंपदामंत्री डी. के.शिवकुमार यानी  एम.बी.पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते.

मंत्रिपद देण्यासाठी दबाव 

सध्या मंत्रिमंडळात 3 जागा शिल्लक आहेत. त्यानुसार उत्तर कर्नाटकाला प्राधान्य देण्यात यावे. प्रादेशिकता, जाती प्रतिनिधीत्व यांचे निरीक्षण करून राज्याच्या इतर भागातील आमदारांना न्याय द्यावा, अशी मागणी एच. के. पाटील यांनी अ.भा. काँग्रेस  सचिव ठाकूर यांच्याकडे केली आहे. 

विश्वासुनींच द्रोह केला 

पक्षासाठी काम करणार्‍यांची पिछेहाट होत असून याचे दु:ख होते. विश्वासूनीच केलेल्या चुकीचे  फळ  आम्हाला भोगावे लागणार आहे. आपण कोणत्याही कारणास्तव भाजपमध्ये जाणार नाही. स्वाभिमानाला धक्का पोचल्यास मात्र सहन करणार नाही. मागील सरकारात 5 वर्षे मंत्री असणार्‍यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र एकाला  एक न्याय तर दुसर्‍याला दुसराच न्याय देऊन दुजाभाव दाखविणे चुकीचे असल्याचे माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी म्हटले आहे.