होमपेज › Belgaon › मातेची आत्महत्या, मुलीच्या परीक्षेवर पाणी

मातेची आत्महत्या, मुलीच्या परीक्षेवर पाणी

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 24 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

शेजार्‍यांबरोबर वारंवार होत असणार्‍या वादामुळे मनस्ताप करून घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. यामुळे इयत्ता दहावीत शिकणार्‍या तिच्या मुलीवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही घटना बैलहोंगल तालुक्यातील बसवेश्‍वरनगर आश्रय कॉलनी येथे घडली आहे. प्रेमा कल्लाप्पा तोटगी (वय 40, रा. बसवेश्‍वरनगर, आश्रय कॉलनी, बैलहोंगल) असे महिलेचे नाव आहे. तिला तातडीच्या उपचारासाठी गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून मृत प्रेमा तोटगी व शेजारील 6-7 कुटुंबीयांमध्ये मोठी वादावादी झाली होती. त्यात त्यांना मारहाणही झाली. त्यात प्रेमा गंभीर जखमी झाल्या होत्या. तिच्यावर बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात येत होते; मात्र मुलीची दहावीची परीक्षा असल्याने त्या घरी आल्या होत्या. या दरम्यानही शेजार्‍यांबरोबर असणारे भांडण सुरूच होते. 

प्रेमा तोटगी यांच्या घरावर गुरुवारी दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे मनस्ताप होऊन प्रेमा यांनी गुरुवारी विष प्राशन केले होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यामुळे इयत्ता दहावीत शिकणार्‍या प्रेमा यांच्या मुलीला परीक्षेपासून वंचित रशहावे लागले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे  नातेवाईकांतून हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, suicide, Prema Tondgi,