Sat, Mar 23, 2019 12:26होमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत महिला मते निर्णायक

पालिका निवडणुकीत महिला मते निर्णायक

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMबेळगाव : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत असून एकगठ्ठा मते मिळविण्याकडे उमेदवारांनी कसरत सुरू केली आहे. बहुतेक ठिकाणी पुरूषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. त्यामुळे महिलांच्या मतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हेाणार्‍या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या 2,08,968 आहे. तर पुरूष मतदारांची संख्या 2,05,851 इतकी आहे. पाच वर्षांमागे 2013 मध्ये या संस्थांमध्ये निवडणूक झाली त्यावेळी महिलांची संख्या कमी होती. आता महिला मतदार वाढल्याने राजकीय पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार त्यांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. महिला आता केवळ चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित नसल्याची जाणीव राजकीय नेत्यांना होत आहे. 

2013 च्या निवडणुकीमध्ये 1,61,780 पुरूष आणि 1,56,072 महिला मतदार होत्या. पाच वर्षानंतर पुरूष मतदारांची संख्या 44,071 इतकी वाढली आहे. तर महिला मतदार 52,896 इतक्या वाढल्या आहेत. एकूण मतदारांची संख्या 96,967 इतकी वाढली आहे. एकूण 20 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील 14 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चिकोडी नगरपालिका, कुडची नगर परिषद आणि रायबाग नगर पंचायतीत महिला मतदार कमी आहेत. चिकोडीत 16,600 पुरूष, 16,486 महिला मतदार आहेत. कुडचीत 10,758 पुरूष आणि 10,014 महिला आहेत. रायबागमध्ये 9,021 पुरूष आणि 8,354 महिला मतदार आहेत. 

प्रभाग संख्येत वाढ

लोकसंख्येच्या आधारावर प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रभाग संख्या वाढली आहे. 2013च्या निवडणुकीत 311 प्रभाग होते. यंदाच्या निवडणुकीत 343 प्रभाग आहेत.