Wed, Mar 20, 2019 12:54होमपेज › Belgaon › महिलांचे पहिले खुले कारागृह धारवाडमध्ये

महिलांचे पहिले खुले कारागृह धारवाडमध्ये

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 8:24PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील पहिले खुले महिला कारागृह धारवाड येथे स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतची पाहणी मध्यवर्ती कारागृहाकडून करण्यात येणार असून त्यानंतर सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे राज्यातील पहिलेच महिला कारागृह असणार आहे.

सध्या बंगळुरातील देवनहळ्ळीत खुले कारागृह असले तरी ते केवळ पुरुषांकरिता आहे. सद्वर्तनी महिला कैद्यांसाठी खुले कारागृह आवश्यक आहे. धारवाडमध्ये ते स्थापन करण्याची तयारी केली जात असून त्याकरिता वरिष्ठ अधिकार्‍यांची संमती आहे. केरळमध्ये महिलांसाठी अशा प्रकारचे खुले कारागृह आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून महिला कैद्यांचे मनपरिवर्तन करणे शक्य झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये  शिक्षा भोगणार्‍या महिला कैद्यांना रोजगार आणि कुटुंबाची देखभाल करण्याची संधी दिली आहे. त्याच धर्तीवर आता आदर्श महिला खुले कारागृह उभारण्याचा विचार केला जात आहे.

या कारागृहासाठी किमान 60 ते 75 एकर जमिनीची गरज आहे. यासाठी बेळगाव-धारवाड मार्गावर उच्च न्यायालयानजीक किंवा धारवाड-नवलगुंद मार्गावरील मारडगी येथे जागेची पाहणी करण्यात आली आहे. मारडगी येथे शेतजमीन आहे. पिकाऊ जमिनीचे संपादन करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानजीकची जमीन संपादित करण्याबाबत अधिकार्‍यांनी चर्चा केली आहे. शिवाय भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शेजारी असणार्‍या जागेत खुले महिला कारागृह स्थापन करण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.धारवाडमधील हवा, सामाजिक आणि संस्कृतिक वातावरण चांगले आहे. वाहतूक व्यवस्था, महिलांची सुरक्षितता या बाबतीत अनुकूलता आहे. त्यामुळे या परिसरात खुले कारागृह स्थापन करण्याची मागणी प्रस्तावात करण्यात येणार आहे.

खुले कारागृह म्हणजे काय?

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्यांना कारागृहात डांबण्यापेक्षा त्यांचे मनपरिवर्तन करण्याची ही नवी पद्धत आहे. कैद्यांना डांबण्यापेक्षा शेती, बागायत, स्वयंरोजगार, हस्तकला वस्तू तयार करणे, दुग्धोत्पादन अशी कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात.