होमपेज › Belgaon › कुटुंबियांसमवेत जीवन संपवू!

कुटुंबियांसमवेत जीवन संपवू!

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:32AMखानापूर : प्रतिनिधी

उदिपुडी येथील शिवसागर साखर कारखाना आणि गोकाक तालुक्यातील हिरेनंदी येथील सौभाग्यलक्ष्मी कारखान्याने वेळेत ऊसबिलाची रक्कम अदा न केल्याने कंगाल झालो असून उपासमारीची वेळ आली आहे. पैशाविना कुटुंबाची होत असलेली परवड असह्य ठरली असून सार्‍या कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे इशारापत्र लिंगनमठ (ता. खानापूर) येथील बाळाप्पा शंकर माटोळी यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.

मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री कुमारस्वामी, आ. डॉ. अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुख यांच्या नावे पत्र लिहून कुटुंबाच्या वाताहतीला हे दोन साखर कारखानेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

बाळाप्पा यांनी निवेदनात कुटुंबियांना भोगाव्या लागणार्‍या यातनांची माहिती दिली आहे.  यात म्हटले आहे की, आपल्या वडिलांच्या नावे चार एकर जमीन आहे. तीन वर्षापूर्वी विविध बँकांतून त्यांनी साडेसात लाखाचे पीक कर्ज काढले. शेतात दोन विहिरी खोदल्या. त्याला पाणी न लागल्याने खर्च वाया गेला. परिणामी ऊस बिलातून ते कर्ज फेडणार होते. मात्र रामदुर्गमधील शिवसागर कारखान्याने 2015-16 सालात पाठविलेल्या ऊस बिलाची अजूनही पूर्तता केली नाही. गोकाकच्या सौभाग्यलक्ष्मी  कारखान्याला 2013-14 साली आपला ट्रक ऊस वाहतुकीसाठी दिला होता. त्याचेही भाडे सदर कारखान्याने दिलेले नाही.

गेल्या दोन वर्षापासून वडील अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या आजारपणाच्या खर्चासाठी ट्रक विकावा लागला. त्यामुळे बेरोजगार व्हावे लागले आहे. आईची स्थितीही खालावली असून रोजच दवाखाना खर्च करावा लागत आहे. तो परवडत नसल्याने घरातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खाण्यासाठीही घरात धान्य नसून कुटुंबाची परवड पाहवत नसल्याने आपल्यापुढे आई, वडील, पत्नी व मुलांसोबत सामूहिक आत्महत्येशिवाय अन्य पर्याय नसल्याचे माटोळी यांनी म्हटले आहे.