होमपेज › Belgaon › विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:19PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

विजेच्या तारांचा झाडांना स्पर्श होत असल्याने त्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का बसल्याने हेस्कॉम कर्मचारी सतीश सदानंद पाटील (वय 20, रा. हुल्लोळी ता. हुक्केरी)  याचा  मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी श्रीपेवाडी येथे  घडली. घटनेची नोंद बसवेश्‍वर चौक पोलिसांत झाली आहे. 

विभागांतर्गत येणार्‍या मुख्य लाईनमननी एलसी न घेतल्याने ही दुर्घटना ओढवल्याची चर्चा होती.श्रीपेवाडी येथील जी.एम.संकपाळ हायस्कूल परिसरात शनिवारी सकाळी तारांना लागणार्‍या झाडाच्या फांद्या खांबावर चढून सतीशसह या विभागाचे लाईनमन संतोष वाळके व शिवराज मिरजे तोडत होते. घरगुती विजेचा पुरवठा बंद केला असला तरी पंपसेटसाठी लागणारा प्रवाह सुरूच होता.

खांबावर चढलेल्या सतीश यांना तारेचा धक्का बसला. ओरडून तो तसाच खांबावर लोंबकळत राहिला. वाळके व मिरजे यांच्या लक्षात घटना आल्याने त्यांनी आरडाओरड केली. सतीशला नागरिकांनी खाली घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात हलविला.

घटनास्थळी हेस्कॉमचे अभियंता शशिकांत चिकाडे, ग्रामीण अभियंता बी. एस. ऐनापुरे, शहरचे अक्षय चौगुले, बसवेश्‍वर चौकच्या फौजदार रोहिणी पाटील, हवालदार नितीन बडिगेर, एस. एम. सनदी यांनी जाऊन पंचानामा केला.