Tue, Mar 26, 2019 20:15होमपेज › Belgaon › शाळा आवारात भाजी पिकणार का ?

शाळा आवारात भाजी पिकणार का ?

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:37PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी शाळेत मध्यान्ह आहार योजना चालू करुन प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कामास लावले आहे. आता नव्याने शाळेच्या आवारातच भाजीपाला पिकवून तो मध्यान्ह आहारात वापरावा, अशा आदेशाचे पत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी जि. पं.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बगायत वन व कृषी खाते सरकारी शाळेला सहाय्य करणार आहे. 

शाळा चालू होण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत. शिक्षकांना  शाळा सुरु झाल्यानंतर भाजीपाला पिकविण्यासाठी काम करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना यादीप्रमाणे मतदान ओळखपत्र नागरिकांना मिळाले की नाही, याची शहनिशा करण्याचे काम सोपविले होते. नव्याने आलेली मतदान ओळखपत्रे घरोघरी पोहचविण्याचे काम केल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या कामात गुंतविण्यात आले. निवडणुकीदिवशी 12 तास सेवा बजावण्याचा आदेश होता. तत्पूर्वी व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदान कसे होते, याचे प्रशिक्षण शिक्षकाना देण्याचे काम सुरु होते.  यापूर्वी सरकारी शाळेत मध्यान्ह आहार योजना सरकारी शाळेत राबविली जात आहे. यामुळे या कामासाठी दुपारचे दोन तास निघून जातात. सहा तासापैकी दोन तास या कामात गेल्याने केवळ चार तासात शिक्षण काम चालते.  

जिल्ह्यातील काही शाळा सरकारी शाळेत भाजीपाला पिकवून याचा वापर मध्यान्ह आहारात करीत आहेत. खानापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये हा प्रयोग शिक्षकांनी  केला आहे. त्याचे अनुकरण इतर शाळांनीही करावे, अशी अपेक्षा शासन करीत आहे. मंगळूर जिह्यातील बटवाळ येथील माध्यमिक शाळेने आवारात भाजीपाला पिकविण्याचा  प्रयोग केला. यातून शाळेला 4 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या तत्त्वावर सरकारी शाळांनी काम करावे, अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम चांगला असला तरी, राज्यातील सर्वच शाळांमध्ये राबविण्यासाठी प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. कारण सध्या सरकारी शाळेत पटसंख्या कमी असल्याने पहिली ते चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम एकच शिक्षक घेत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर शिक्षकांना लावण्यात येत असलेली कामे कमी झाली पाहिजेत. काही शाळेमध्ये बढतीवर मुख्याध्यापक रुजू न झाल्याने मुख्याध्यापकाचे काम सहशिक्षकांना करावे लागत आहे. यातच शाळेच्या आवारात भाजीपाला, फळभाज्या, फळे पिकविण्याचा प्रस्ताव शाळेसमोर शिक्षण खात्याने ठेवला आहे. यामुळे हा उपक्रम राबवून शाळेचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा हा प्रश्‍न शिक्षकांसमोर आहे.