Sun, May 26, 2019 21:06होमपेज › Belgaon › नव्या वर्षात पासपोर्ट केंद्र सुरु होणार का?

नव्या वर्षात पासपोर्ट केंद्र सुरु होणार का?

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:04PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र हा शहरवासीयांचा प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे. सुमारे एक वर्षापासून रेंगाळत चाललेल्या या प्रश्‍नाकडे परराष्ट्र मंत्रायलाने कानाडोळा केला आहे. डाक कार्यालयातून कोणत्याही हालचाली होत नसल्याने पासपोर्ट सेवा केंद्राचे घोडे भिजत पडले आहे. यासाठी नव्या वर्षात तरी पासपोर्ट सेवा केंद्राला मुर्हूत मिळेल का, असा प्रश्‍न बेळगावकरांन पडला आहे. 

मुख्य डाक कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने येथील फर्निचर, संगणक आदी कामे आटोपली आहेत. मात्र, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याने केंद्राला मुहूर्त मिळत नाही. यासंबंधी डाक कार्यालयातूनदेखील कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. यासंबंधी खा. सुरेश अंगडी यांनी सहा महिन्यांपूर्वी संबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत एक महिन्यात पासपोर्ट केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरीदेखील केंद्र सुरु करण्यात आले नाही. केंद्रात भाजपचे सरकार असूनही केंद्राला सुरुवात झाली नाही. यामुळे खा. अंगडींचे केंद्रात कोणी ऐकत नाही का,  असाही प्रश्‍न शहवासियांना पडला आहे. 

पासपोर्ट केंद्राचे घोंगडे भिजत पडल्याने बेळगावकरांना हुबळीला जाऊन हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. यासाठी त्वरित केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. 

बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मागील संसदीय हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली होती. याला वर्षभराचा कालावधी उलटला तरीदेखील केंद्र सुरु झाले नाही. नूतन वर्षाच्या सुरुवातीला तरी केंद्र सुरु करावे. अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.