होमपेज › Belgaon › महापालिकेचा राज्यशकट सुरळीत चालणार का?

महापालिकेचा राज्यशकट सुरळीत चालणार का?

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी 

भिन्‍न विचारसरणीचे आणि दोन गटातींल  नेते बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. यामुळे महापालिकेचा राज्यशकट व्यवस्थित चालेल का, असा प्रश्न आहे. 
महापौर बसाप्पा चिक्‍कलदिन्‍नी हे कन्‍नड गटाचे आणि उपमहापौर मधुश्री पुजारी मराठी गटाच्या आहेत. यामुळे महत्त्चाच्या मुद्यावर विशेष करून ‘मराठी’च्या बाबतीत वादाचे प्रसंग उद्भवले तर आश्‍चर्य वाटायला नको. अशी राजवट यापूर्वी चार वेळा होती.

कर्नाटक सरकारची राजकीय खेळी सध्या तरी यशस्वी ठरली आहे. महापौऱपद  आरक्षित झाल्याचा फायदा अनुसूचित जमातीचे चिक्‍कलदिनी यांना मिळाला.  माजी महापौर शिवाजी सुंठकर यांचे ते समर्थक मानले जातात. मागासवर्गातून ते आलेले असल्याने त्या समजाविषयी त्यांना कणव आहे. महापालिका व्याप्‍तीतील अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या कल्याणकारी योजना राबविण्यात ते विशेष लक्ष घालतील, अशी आशा ठेवता येईल.

महापालिकेवर आजही मराठी गटाचेच वर्चस्व आहे. केवळ महापौर कन्‍नड गटाचा आहे. चिक्‍कलदिनी कन्‍नडधार्जिणे आहेतच. यामुळे त्यांच्याकडून मराठीच्याबाबतीत दुजाभाव होणार नाही, असे ठामपणे सांगता येणार नाही. एखाद्या बाकाप्रसंगी अथवा निर्णय घेताना ते सरकारच्या बाजूनेच उभे राहणार यात शंकाच नाही, कारण सरकारी आरक्षणामुळे ते या पदावर आरूढ आहेत.1992 मध्ये सिद्दनगौडा पाटील महापौर बनले होते. ते पहिले कन्‍नड महापौर. यानंतर यल्‍लाप्पा कुरबुर हे राखीवतेमुळे महापौर बनले. ते मागास जमातीचे. यानंतर नाट्यमय घडामोडीत लिंगायत समाजाचे एन. बी. निर्वाणी महापौरपदी आयते विराजमान झाले होते. या निवडणुकीवेळी कुरबुर यांनी मखलाशी केली. 

मराठी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून निर्वाणी यांना संधी दिली होती. ही खेळी कुरबुर यांनी खेळली होती. त्यानंतर प्रशांता बुडवी महापौर बनल्या. त्यानंतर चौथे कन्नड महापौर चिक्कलदिनी. अर्थात आमदार संभाजी पाटील यांच्या वरदहस्तामुळे मधुश्री पुजारी उपमहापौर असल्या तरी मराठी भाषिकांसाठी त्याच महापौर. शिवाय महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौरच सभागृहाचे कामकाज चालवतात. यामुळे महापौर कन्‍नड आणि उपमहापौर मराठी असल्याने शहराला आदर्श ‘विकासनगरी’ बनवण्यासाठी हे दोघे राज्यकारभार कसा करतात, हे पाहवे 
लागेल