Thu, Apr 25, 2019 15:43होमपेज › Belgaon › मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला गती येणार?

मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला गती येणार?

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 10:28PMबेळगाव : प्रतिनिधी

शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्यात आल्यानंतर अनेक विकासकामांना चालना देण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू करून वर्ष उलटत आले तरी अद्याप संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नियोजित वेळेत बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अशक्य ठरले आहे. तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाच्या कामाला गती देण्याची मागणी शहरवासियांतून करण्यात येत आहे. 

साडेचार एकरमध्ये अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येत आहे. मात्र  काम रेंगाळले आहे. या ठिकाणी असणारे यापूर्वीचे गॅॅरेज अ‍ॅटोनगर येथे हलविण्यात आले आहे. सुसज्ज इमारत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, गोव्याशी जोडणारे मध्यवर्ती केंद्र म्हणून बेळगाव शहराकडे पाहिले जाते. या बसस्थानकातून रोज 2 हजार पेक्षा अधिक बस ये-जा करतात. हुबळी, मुंबई, पुणे, गोवा चेन्नई, हैद्राबाद, मंगळूर, बागलकोट, बंगळूर, म्हैसूर, बिदर, विजापूर आदी महत्वाच्या शहरांना सीबीटीवरून बस आहेत.

दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांची वाहतूक होत असली तरी बसस्थानक सुसज्जित नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना विश्रामगृह, पाण्याची व्यवस्था, शौचालये, आवश्यक आस्थापने, वाहनांसाठी थांबण्याची सोय, डिजीटल बोर्ड, वायफाय सुविधा, रॅम्प आदि महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ करून  दोन वर्षाचा कालावधी लोटत आला तरी काम पूर्ण झालेले नाही. 3 डिसेंबर 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते कोनशीला बसवण्यात आली होती. कामाचा दर्जा ठेवून इमारती उभारण्यात याव्यात, फेब्रुवारी 2018 पर्यंत काम पूर्ण करून बसस्थानक नागरिकांच्या सोयीला उपलब्ध करून द्यावे, अशी सुचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र हा कालावधी उलटून गेला तरी अद्याप काम अपुरेच आहे. 

निवडणुकांच्या घाई गडबडीत असणार्‍या लोकप्रतिनिधींकडून संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडून बसस्थानकाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यामध्ये आणखी अधिक भर पडली आहे. 
याबाबत परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी महादेवप्पा यांच्याकडे चौकशी केली असता आपण सेवेत रूजू होऊन दिड महिन्याचा कालावधी झाला आहे. यातच विधानसभा निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे कामाला विलंब झाला आहे. अपेक्षेप्रमाणे कामाला गती देण्यात आलेली नाही. भविष्यामध्ये या कामाला वेग देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.