Mon, Aug 26, 2019 01:28होमपेज › Belgaon › यंदातरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार का?

यंदातरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार का?

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 09 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. गतवर्षी शहरात केवळ पर्यावरणपूरक श्री मूर्ती पूजवाव्यात, यासंबंधी मूर्तिकारांना आगावू नोटिसा तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर गणेशभक्तांनी मोर्चा काढून विरोध दर्शविला. शाडूच्या मूर्ती मिळाल्या नाही तर पीओपी मूर्तींना परवानगी देण्याची मागणी शहरातील मूर्तिकारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. तीन महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यादृष्टीने 2013 पासून प्रयत्न चालविले आहेत. मात्र शहरात पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे पीओपी मूर्तींना परवानगी द्या, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र 2016 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जयराम यांनी पुढीलवर्षी केवळ शाडूच्या मूर्ती बनवा असा आदेश मूर्तिकारांना देत परवानगी दिली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी मूर्तिकारांना नोटिसा बजावल्या होत्या.  मात्र बेळगाव मूर्तिकार संघटनेने केला. त्याविरोधात निवेदनदेखील सादर केले. मात्र प्रशासन आपल्या मतावर ठाम राहिले. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मदतीने पीओपी मूर्तीना प्राधान्य मिळावे, यासाठी प्रयत्न चालविले. गणेशभक्त, मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पीओपी मूर्तीला प्राधान्य देण्याची मागणी केली. त्या काळात जिल्हाधिकारी एन. जयराम यांची बदली झाली.  त्यानंतर एस. झियाऊला यांच्याकडे सूत्रे आली.

कोल्हापूर मूर्ती शाळेवर परिणाम

बेळगावसह ग्रामीण भागात कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पीओपीपासून बनविलेल्या मूर्ती आणल्या जातात. त्या पाण्यात विरघळत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याला काळा रंग प्राप्त होतो. त्याशिवाय गणेशमूर्तीचे विटंबन झालेले चित्र सगळीकडे पाहावयास मिळते. जिल्हाधिकार्‍यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्याचा इशारा दिल्यानंतर कोल्हापुरातील मूर्ती बनविण्याच्या शाळा ओस पडल्या होत्या.

बंगळुरात कारवाई

पहिल्यांदा बंगळुरात  पीओपीपासून मूर्ती बनविणार्‍या कारखान्यांना सील करण्यात आल्यानंतर पीओपीपासून मूर्ती बनविणार्‍या मूर्तिकार व व्यावसायिकांनी कारवाईची धास्ती घेतली. त्यानंतर राज्यात जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई केली. मात्र बेळगावात कारवाई झालीच नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यात तयार झालेल्या पीओपी मूर्ती बेळगावात दाखल झाल्या. 

खानापुरात संघटना स्थापन

बेळगाव शहर व परिसरात पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीला प्राधान्य द्या. या मुद्द्यावर खानापूर तालुक्यातील शाडू मूर्तिकार एकवटले. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शाडू मूर्तीला प्राधान्य देण्याचा आग्रह धरला. बंगळूर, हुबळी, गोव्यामध्ये खानापूरमधून लाखो मूर्ती निर्यात झाल्या. त्यामुळे स्थानिक कलाकारांना न्याय मिळाला.