Fri, May 24, 2019 09:17होमपेज › Belgaon › बेळगावचे नाट्यक्षेत्र तंत्र-ज्ञानी बनवणार

बेळगावचे नाट्यक्षेत्र तंत्र-ज्ञानी बनवणार

Published On: Mar 08 2018 8:42PM | Last Updated: Mar 08 2018 8:37PMबेळगाव : सुनील आपटे

परिषदेच्या बेळगाव शाखेची सदस्यसंख्या वाढविणे, सर्व प्रकारची नाटके बेळगावात आणणे आणि त्यासाठीचा कर्नाटकचा प्रवेश कर रद्द करणे यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्या वीणा लोकुर यांनी दै. ‘पुढारी’कडे बोलताना दिली.

2015 च्या फेब्रुवारीमध्ये अ. भा. मराठी नाट्य संमेलन बेळगावात भरले होते. त्या निमित्ताने शाखेचे 517 सदस्य झाले होते. आता ही संख्या वाढवावी लागणार आहे. संमेलन माझ्या शाखाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत भरले. ज्या उद्देशाने संमेलन भरले, ती साकार करायची आहेत, असे  त्या म्हणाल्या.बेळगाव हे नाट्य लेखक आणि कलाकारांची खाण आहे. अनेक कसदार कलावंत आहेत. याची वानवा कधीच भासत नाही. परंतु तंत्र-ज्ञानदृष्ट्या बेळगावची रंगभूमी खूप मागे आहे. आहे त्या सामग्रीत नाटके बसवून ती सादर करणे यात बेळगावकर समाधान मानतात. परंतु आता पडद्यामागील कौशल्ये आणि तांत्रिकदृष्ट्याही कलेचे माहेरघर बेळगाव उन्‍नत झाले पाहिजे. यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा, तज्ज्ञांना बोलावून प्रात्यक्षिके, व्याख्याने आदीचे आयोजन परिषदेच्या सहकार्याने करणार आहे. अभिनय कार्यशाळा यापूर्वीही घेतल्या होत्या. आता अशी शिबिरे घेतली जातील. बेळगावात रंगभूमीच्या दृष्टीने सर्व काही अद्यावत उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेळगावात प्रायोगिक, संगीत नाटके आणणे तसे सोपे आहे. पण व्यावसायिक नाटके खर्चिक ठरतात. तरीही सर्व प्रकारची नाटके बेळगावच्या नाट्यरसिकांना पाहता यावीत, यासाठी परिषदेकडे पाठपुरावा करेन, असे त्या म्हणाल्या.  याआधी पाच वर्षे कार्यकारिणी सदस्या होते.आता पुन्हा पाच वर्षांसाठी संधी मिळाली आहे. मोहन जोशी यांच्या पॅनेलची कार्यकारिणी निवडून आली तर पद मिळण्याची शक्यता लोकुर यांनी व्यक्‍त केली.