होमपेज › Belgaon › सभांची गर्दी मतांमध्ये परावर्तीत होणार?

सभांची गर्दी मतांमध्ये परावर्तीत होणार?

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात उष्म्याबरोबर निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणूक 12 मे रोजी होणार असून विविध पक्षातील उमेदवारांच्या प्रचाराला गती आली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते गावेे पिंजून काढत आहेत. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांसह देशपातळीवरील तसेच विविध राज्यांतील नेते प्रचारसभा गाजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या नेत्यांच्या सभांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र ही गर्दी मतांमध्ये कशी परावर्तीत होणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.

दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच त्यांच्या विधानांना टाळ्याही मिळत आहेत. संबंधित पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी व्हावी म्हणून जीवाचा आटापिटा करत आहेत. आपल्याच सभेला मोठी गर्दी व्हावी, यासाठी उमेदवारांकडून प्रलोभने दाखविण्यात येत असल्याची चर्चाही ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे सभांना उपस्थिती लावणारे संबंधित उमेदवारांनाच मत देणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

निवडणूक म्हटली की पदयात्रा, प्रचारफेर्‍या, सभा या ठरलेल्याच असतात. अनेक उमेदवारांच्या  पदयात्रा, प्रचारसभांना गर्दी होताना दिसत आहे. ‘आवाज कोणाचा...’ ‘येऊन, येऊन येणार कोण...’ असे नारेही सभांमधून ऐकावयास मिळत आहेत. प्रचारासाठी येणारे दिग्गज नेते आपला उमेदवारच ‘लय भारी’ असल्याचे मतदारांच्या मनावर बिंबविण्यासाठी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत. एखाद्या भागात गेल्यानंतर तेथील स्थानिक भाषेमधून भाषणाला सुरूवात करून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे भावनिक आवाहन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांची उणीधुणी काढून टाळ्या मिळविण्यात येत आहेत. 

सभांना नागरिकांची मोठी गर्दी करून विरोधकांच्या मनात धडकी भरविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दिग्गज नेत्यांच्या रोड  शोचे आयोजन करूनही मतदारांवर प्रभाव पाडण्यात येत आहे. निवडणूक झाली की काही उमेदवारांचे दर्शन दुर्मीळ होते. निवडणूक जाहीर की लोकप्रतिनिधी, नेते पुन्हा सक्रीय होतात. दिग्गज नेत्यांना आणून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होेतो. काहीजण मतदारांना गृहीत धरतात. मात्र, त्याचा  फटका त्यांना निवडणूक निकालानंतर बसतो.

सध्याचे मतदार सूज्ञ असून नेत्यांच्या भंपकगिरीला ओळखून आहेत.  त्यामुळे  सभा, रोड शोना होणारी गर्दी ही मतदानामध्ये दिसणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सभांना होणारी गर्दी पाहून काही उमेदवार हुरळून जातात. मात्र मतदारराजाच्या मनात काय चाललंय याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रचारसभांना होणारी गर्दी पाहून निकालाचे आडाखे बांधण्यात येत आहेत. अमूक पक्षाच्या उमदेवाराचा विजय निश्‍चित आहे. त्याच्या सभांना बघा किती गर्दी आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पण शेवटी निकालानंतर मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मतदार हाच राजा

अनेक नेत्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होते. मात्र, मतदानावेळी त्यांच्याविरूद्ध कौल लागतो. अशी अनेक उदाहरणे विविध निवडणुकांमधून पाहायला मिळाली आहेत. निवडणुकींचा इतिहास पाहिल्यास दिग्गजांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे.  त्यामुळे सभेला गर्दी झाली म्हणजे मतदारांचा कौल त्या उमेदवाराच्या बाजूने आहे, असे म्हणणे रास्त ठरणार नाही. दिग्गजांच्या प्रचाराच्या तोफा मैदाने गाजवत आहेत. मात्र, शेवटी मतदार हाच  राजा आहे.