Tue, Apr 23, 2019 00:09होमपेज › Belgaon › सर्वांत तरुण मंत्री ठरण्याची शक्यता 

गणेश हुक्केरींना मंत्रिपद मिळणार का?

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:08AMचिकोडी : प्रतिनिधी

निजद-काँग्रेस युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी बुधवारी शपथ घेणार आहेत. दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आ. गणेश हुक्केरी यांची वर्णी या मंत्रिमंडळात लागणार का हीच चर्चा संपूर्ण मतदारसंघात सध्या ऐकावयास मिळत आहे.

तीन दिवसांच्या घडामोडीनंतर बी. एस. येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे निजद-काँग्रेसचे सरकार येणार हे निश्‍चित झाले आहे. निजदला 13 तर काँग्रेस पक्षाला 20 मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. 
बेळगांव जिल्ह्यातील 10 जागांवर भाजपा तर 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. तर रमेश जारकीहोळी हे तीनवेळा तर सतीश जारकीहोळी पाचवेळा व गणेश हुक्केरी दोनवेळा निवडून आले आहेत. ज्येष्ठतेनुसार मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये  सतीश जारकीहोळींचा पहिला क्रमांक लागतो, नंतर रमेश जारकीहोळी व गणेश हुक्केरींचा लागतो. पण यापूर्वी अनेकदा जारकीहोळी बंधूंना मंत्रिपद मिळालल्याने एकट्याला मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

तरुण, सजगआमदार व मागच्या सरकारमध्ये महसूल खात्याचे राज्य संसदीय सचिव म्हणून चांगल्याप्रकारे काम केलेले चिकोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरींना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याचे समजते. हायकमांडमध्ये चांगले वजन असलेले पिता खासदार प्रकाश हुक्केरींचे बेंगळूरात  तळ ठोकून फिल्डींग लावल्याचे समजते.

विशेष म्हणजे मागील लोकसभेच्या निवडणुकीत मोदीची लाट असताना केवळ हायकमांडच्या सूचनेनुसार त्यानी साखर व लघुउद्योग मंत्रिपदाचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक खा. प्रकाश हुक्केरींनी लढविली होती. त्यानंतर झालेल्या  पोटनिवडणुकीत पुत्र आ. हुक्केरी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. दरम्यान गणेश हुक्केरींना राज्य संसदीय सचिव पद देण्यात आले. त्यांनी 3 वर्षाच्या कालावाधीत अनेक विकासकामे राबवत कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान मोदी भाजप उमेदवाराच्या प्रचारास येवूनदेखील दुसर्‍यांदा गणेश हुक्केरी विधानसभेवर निवडणून आले. त्यामुळे खासदार प्रकाश हुक्केरींच्या आग्रहाखातर  व युवा आमदार म्हणून गणेश हुक्केरींना मंत्रीपद देण्याची शक्यता आहे.

केपीसीसी महिला विभागाच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर मागील 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षात असून त्यांना महिला कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची शक्याता आहे. तसेच मागील कांही वर्षांपासून बालभवनच्या अध्यक्ष म्हणून कार्य करत खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत करत 60 वर्षांनी काँग्रेसची सत्ता आणत इतिहास निर्माण केलेल्या खानापूरच्या पहिल्या महिला आमदार अंजली निंबाळकर यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.