होमपेज › Belgaon › रेल्वेमार्गावर वाईल्डलाईफ पॅसेजची गरज

रेल्वेमार्गावर वाईल्डलाईफ पॅसेजची गरज

Published On: Mar 24 2018 1:47AM | Last Updated: Mar 22 2018 10:20PMखानापूर : वासुदेव चौगुले

मानवाच्या सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने रेल्वे प्रवास अधिक सुखकर व किफायतशीर मानला जातो. पण हीच रेल्वेलाईन खानापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांसाठी मात्र जीवघेणी ठरत आहे. कोणत्याही उपाययोजनांअभावी सताड उघडा असणारा लोहमार्ग वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा महामार्ग ठरल्याने अधिक संचाराच्याठिकाणी लोखंडी कुंपण उभारुन जागोजागी वाईल्डलाईफ पॅसेजची निर्मिती करणे अत्यावश्यक बनले आहे.

तालुक्यातून जाणार्‍या लोहमार्गाच्या बाजूला अंदाजे 65 किमी वनक्षेत्र तर 30 किमी  खासगी जमीन लागते. उन्हाळ्यात जंगलात पाणी व खाद्याचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे मुबलक पाणी व खाद्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. जंगलाच्या मध्यातून गेलेल्या लोहमार्गावर काही ठिकाणी दरीसदृश्य परिस्थिती आहे. अशा ठिकाणी गवे अथवा हत्ती सापडल्यास त्यांना तात्काळ मार्गावरुन बाहेर येणे कठीण जाते. परिणामी अपघातांना बळी पडावे लागते.

शेडेगाळीनजीकच्या बुधवारच्या घटनेनंतर वनखात्याने गांभीर्याने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. आजपर्यंतच्या अपघातांची पाहणी केल्यानंतर वन्यप्राणी दुर्घटनेचा कालावधी हा डिसेंबर ते मार्च या महिन्यांदरम्यानचा असल्याचे आढळून आले आहे. त्यातही ठरावीक जागीच वारंवार दुर्घटना घडल्या आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास हिरवी पिके आणि त्याला लागून असलेले नदीपात्र वन्यप्राण्यांना खुणावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. खाद्याच्या मोहापायीच धोकादायक ठिकाणावरुन लोहमार्ग ओलांडण्याचे प्रमाण वाढले आहे.

खानापूर वनक्षेत्रापैकी शेडेगाळी, हारुरी ते मणतुर्गा यादरम्यानच्या लोहमार्गावर तीन ठिकाणी गेटमनरहित रेल्वेगेट आहेत. तर दोन ठिकाणी वन्यप्राणी व शेतकर्‍यांच्या सोयीसाठी भुयारी पूल आहेत. नदीपात्रापासून या जागा लांब अंतरावर आहेत. परिणामी जंगलातून खाद्यासाठी शिवारात आलेले प्राणी माघारी फिरताना आलेल्या मार्गाने परत न जाता नदीला वळसा घालून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अरुंद पट्ट्यातून लोहमार्गावर उतरुन जंगल येईपर्यंत त्यावरुनच प्राण्यांना चालत जावे लागते. यादरम्यान रेल्वे आल्यास बाहेर पडण्यासाठी कोठेच जागा नसल्याने रेल्वेखाली सापडून जीव गमावण्याची वेळ येत आहे.

शेडेगाळीनजीक हालात्री व मलप्रभा नद्यांचा संगम झाला असल्याने येथे उन्हाळ्यातही मुबलक पाणी असते. या काठावर मिरची, मका व भाजीपाल्याची शेती असल्याने या पिकांवर ताव मारण्यासाठी आपूसकच प्राण्यांची पावले यादिशेने वळतात. त्याकरिता याठिकाणी विशेष खबरदारीची गरज आहे.मिरज-लोंढा लोहमार्गाचे दुपदरीकरण होणार असल्याने रेल्वेंची संख्याही वाढणार आहे. तोपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्यास वन्यजीवांचे जगणे मुश्किल होणार आहे.

मागील चार वर्षापासून फेब्रुवारी व मार्च महिन्यांतच वन्यप्राण्यांच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्याही एक ते दीड किमीच्या पट्ट्यातच दुर्घटनांचे प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणांची ओळख निश्‍चित करण्यात आली असून धोकादायक अरुंद जागेतून वन्यप्राणी रूळ ओलांडणार नाहीत. यासाठी खबरदारी म्हणून लोखंडी कुंपणाची उभारणी करण्यासाठी रेल्वे विभागाला कळविण्यात येणार आहे. तसेच वन्यप्राणी लोहमार्गावर जाऊच नयेत. यासाठी भुयारी मार्गाला लागून वाईल्डलाईफ पॅसेज निर्मितीचा वनखात्याचा विचार आहे.   - एस. एस. निंगाणी, वनक्षेत्रपाल

 

Tags : belgaon, belgaon news, Khanapur, railway, Wildlife passage,