Wed, Apr 24, 2019 08:23होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील 179 ग्रा. पं. मध्ये ‘वायफाय’

जिल्ह्यातील 179 ग्रा. पं. मध्ये ‘वायफाय’

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 27 2018 7:55PMबेळगाव : प्रतिनिधी

माहिती-तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून गाव तेथे वाय फाय ही सुविधा सुरू केली आहे. या मोहिमेतून दुसर्‍या टप्प्यात 179 गावे जोडली जाणार आहेत.बेळगाव जिल्हा डिजिटल करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी 255 गावात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. यासाठी खास ओएफसी केबल टाकून प्रत्येक ग्रा. पं. मध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील वायफाय जोडणीला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात एकूण 506 ग्रा. पं. आहेत. त्या सर्व ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रा. पं. साठी राज्य सरकारने निधी उपलब्ध केली. दुसर्‍या टप्प्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला आहे. सदर कामाचा ठेका सीएससीवायफाय औपाल कंपनीला दिला आहे. त्यांच्या माध्यमातून वायफाय सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे.

बेळगाव तालुक्यातील काकती, बाळेकुंद्री के. एच., बाळेकुंद्री बु., मुचंडी, तुमुरगुद्दी, निलजी, हुदली, तुरमुरी, तारिहाळ, आंबेवाडी, हिंडलगा, बेनकनहळ्ळीसह 40 ग्रा. पं. ना वाय फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील 30, बैलहोंगल 12, हुक्केरी 15, अथणी 34, रायबाग 12, रामदुर्ग 12, सौंदत्ती 16 ग्रा. पं.  चा समावेश आहे. राज्यातील एकूण 6 हजार 92 ग्रा. पं. पैकी 2150 ग्रा. पं. ना सीएससी कंपनी, 500 ग्रा. पं. ना कियोनिक्स कंपनी वायफाय सुविधा पुरविणार आहे.

या सुविधांचा मिळणार लाभ

डिजिटल ग्राम योजनेतून पुरविण्यात येणार्‍या वायफाय सुविधेतून सरकारची कोणतीही वेबसाईट मोफत पाहता येणार आहे. मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसणार्‍या गावांना ही योजना अधिक लाभदायक ठरणार आहे. इंटरनेट सुविधा सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे. देशविदेशातील माहिती मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेणे शक्य होणार आहे. 

जुन्या गावांना जोडणीची प्रतिक्षा

पहिल्या टप्प्यात 255 गावामध्ये सदर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी गावामध्ये मुख्य ठिकाणी टॉवर उभारले आहेत. मात्र, त्याठिकाणी अद्याप वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे मागील सहा महिन्यापासून ग्रामीण भागातील जनतेकडून वायफायची प्रतिक्षा करण्यात येत आहे.