होमपेज › Belgaon › बँक घोटाळ्यांवर मोदी गप्प का : राहुल गांधी

बँक घोटाळ्यांवर मोदी गप्प का : राहुल गांधी

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 11:59PMजमखंडी :  वार्ताहर

कोट्यवधी रुपयांचा बँक घोटाळा करून नीरव मोदी, विजय मल्ल्या देश सोडून पळून जातात. देशाचे चौकीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, अशा सवाल काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. जमखंडी तालुक्यातील चिक्‍कपडसलगी येथे श्रमबिंदू सागर बंधार्‍याचे गंगापूजन करून जनआशीर्वाद सभेत त्यांनी हल्‍लाबोल केला.

समानता, अहिंसा, उच्च-नीच भेदभाव न करता म. बसवण्णा यांनी केलेल्या कार्यावर आधारित भारतीय घटना, संसद आहे. कर्नाटकानेच खरी संसद दिली आहे. याच तत्त्वावर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कार्य करीत आहे. पंतप्रधान मोदी बसवण्णांचे नाव घेतात; पण त्यांच्या तत्त्वाविरुद्ध कार्य करीत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 

जलसिंचनात कर्नाटक देशात तिसरे

शेतकर्‍यांकरिता कर्नाटकात पाच वर्षांत 55 हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन योजनांवर खर्च केले. देशात कर्नाटक जल योजनेत तिसरे आहे. आठ हजार शेतकर्‍यांचे कर्ज कर्नाटक सरकारने माफ केले. मोदींनी 1 लाख 40 हजार कोटींची सूट उद्योगपतींना दिल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल म्हणाले, मोदींनी बँक खात्यांवर 15 लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले, त्याचे काय? बोलता त्याप्रमाणे करून दाखवा.
राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. महिला, युवा मोठ्या संख्येने पक्षकार्यात भाग घेत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. भारताच्या इतिहासात खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा आरोप केला.

भाजप सरकारला खेचा

देशात मोदी यांचे वाईट सरकार अधिकारावर आहे. समाजांत फूट, महिला व दलितांवर अत्याचार वाढले असून अशा भाजपला अधिकारावरून खेचण्याचे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.स्वागत आ. सिद्दू न्यामगौड यांनी केले. व्यासपीठावर प्रचार समिती अध्यक्ष डी. के. शिवकुमार, डॉ. जी. परमेश्‍वर, राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल, प्रा. आय. जी. सनदी, जी. मोहन, नझिर कंगनोळ्ळी, वर्धमान न्यामगौड, कल्लाप्पा गिरड्डी, ईश्‍वर करबसण्णवर, अर्जुन दळवाई आदी उपस्थित होते.