Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Belgaon › कोणाचा एक्झिट पोल ठरणार खरा?

कोणाचा एक्झिट पोल ठरणार खरा?

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. 2636 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. भाजप आणि काँग्रेसने  प्र्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत राज्यात 73 टक्के मतदान झाले.विविध वृत्त वाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नसून त्रिशंकू स्थिती निर्माण होणार आहे. यामध्ये काही एक्झिट पोलमध्ये भाजपला तर काहींनी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कोणाचा एक्झिट पोल खरा ठरणार, याबाबत चर्चा रंगत आहे. 

लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्‍या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने दक्षिणेकडील कर्नाटक काबीज करण्यासाठी या निवडणुकीला अधिक महत्त्व दिले आहे. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून बॅकफूटवर पडलेल्या काँगे्रस पक्षानेही कर्नाटकातील आपली सत्ता कायम राखण्यासाठी विविध पातळ्यांवर यंत्रणा राबवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

या निवडणुकीत राज्यात मतदान आकडेवारी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र अडिच टक्क्यांनी मतदान वाढले आहे. त्रिशंकू  विधानसभा होणार असून निजद किंगमेकरच्या भूमिकेत असेल, असा सर्व्हेचा अंदाज आहे. पाच वृत्तवाहिन्यांच्या सर्व्हेनुसार भाजप तर दोन वृत्तवाहिन्यांनुसार काँगे्रस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

रिपब्लिक टीव्ही, एबीपी-सी, टाईम्स नाऊ, इंडिया न्यूज, आणि न्यूजन नेशन यांच्या सर्व्हेनुसार विधानसभेत भाजप मोठा पक्ष असणार आहे. तर इंडिया टीव्ही आणि आज तक च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. आज तकच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला 39 टक्के तर भाजपला 35 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. रिपब्लिक टीव्हीनुसार काँग्रेसला 36 तर भाजपला 38.25 टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

2013 च्या निवडणुकीत काँग्रेसला 122  तर भाजप आणि निजदला प्रत्येकी 40 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी येडियुराप्पा यांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना करून निवडणूक लढविली होती. त्यामुळे मतविभागणीचा फायदा काँग्रेसला झाला होता.

पूर्ण बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता असून विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू आहे. वृत्तवाहिन्या  व वृत्तसंस्थांनी जाहीर केलेे एक्झिट पोल खरे ठरणार का, याबाबत तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत. एक्झिट पोलमधून समोर आलेले आकडे काही वेळेला चुकीचे ठरतात, हे याआधी झालेल्या निवडणुकांमधून पाहायला मिळाले आहे. गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांच्या निवडणुकांवेळी वर्तविण्यात आलेले अंदाज चुकीचे ठरले होते. त्यामुळे यावेळी कोणाचा अंदाज अचूक ठरतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.