Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Belgaon › कुणी तांदूळ घेता का तांदूळ....

कुणी तांदूळ घेता का तांदूळ....

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 10:12PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावसह खानापूर परिसरात रेशनवर मिळणारा तांदूळ विक्री करण्याचा सपाटा अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांनी लावला आहे. यापूर्वी रेशन दुकानदाराच्या संगनमताने तांदूळ काळ्या बाजारात येत होता. आता रेशनकार्डधारकच तांदूळ विक्री करीत आहेत.सध्या अंत्योदय व बीपीएल रेशनकार्डवर माणसी सहा किलोप्रमाणे अन्नभाग्य योजनेअंतर्गत मोफत तांदूळ पुरविला जात आहे. शासनाकडून मिळणारे इतर साहित्य टप्याटप्याने बंद झाले असले तरी सुरुवातीपासुन मोफत तांदूळ वितरण सुरळीत आहे. 

रेशनवर मिळणारा तांदूळ रेशनदुकानदार दलालाच्या संगनमताने काळ्या बाजारात विकत होते. आता ऑनलाईन प्रक्रिया राबविल्यामुळे रेशनकार्डवर नाव नमूद असलेल्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे जुळल्याशिवाय रेशन मिळेनासे झाले आहे. त्यामुळे रेशनवर होणारा यापूर्वीचा भ्रष्ट्राचाराला चाप बसला आहे.  मात्र मोफत मिळत असलेला तांदूळ बाजारात विकण्यास रेशनधारकांनी प्रारंभ केला आहे.काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण बीपीएल रेशनकार्डवर मोफत तांदूळ पुरवू, असे वचन निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने दिले होते. 2013 ची निवडणूक जिंकल्यानंतर त्या जाहीरनाम्याप्रमाणे रेशनवर तांदूळ मिळण्याची सोय झाली. मात्र निवडणूक काळात गव्हाची आयात न झाल्याने मे महिन्यात केवळ तांदूळ व तुरडाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे गव्हाऐवजी तांदूळ मुबलक आहे.  रेशनवर अन्नभाग्य योजनेअंतर्गत मोफत तांदळाबरोबर गहू, मिठाचे पाकीट, पामतेल, तूरडाळ, मूग, रॉकेल देण्यात येत होते. मे महिन्यामध्ये केवळ तांदूळ व तूरडाळ रेशनकार्डवर मिळत आहे.  यापूर्वी रेशन वितरण करताना ऑनलाईन सोय नव्हती. त्यामुळे रेशन आले नाही, तारीख उलटून गेली आहे, अशी कारणे देत रेशनचालक तांदळाचा साठा करुन ठेवत असत. त्यानंतर आपल्या सोईप्रमाणे तो काळ्या बाजारात आणत असत. 

बीपीएल मागणीत वाढ

शासनातर्फे बीपीएल, अंत्योदय रेशनकार्डवर मोफत तांदूळ मिळत असल्याने निवडणूक काळात ऑनलाईन अर्जात बीपीएल रेशनकार्डच्या मागणीला प्रचंड मागणी होती. अन्नभाग्य योजनेअंतर्गत एका सदस्याला 6 किलो तांदूळ मोफत देण्याबरोबर साखर एक किलो13 रुपये 50 पैसे, गहू 7 रुपये 50 पैसे किलो, तुरडाळ 40 रुपये किलो, मूग 25 रुपये किलो, रॉकेल 13 रुपये 60 पैसे ते 14 रुपये 20 पैसे प्रतिलिटर दिले जात होते.  एपीएल रेशनकार्डला 15 रुपये किलोप्रमाणे 10 किलो तांदूळ देण्यात येतो.  

निवडणुकीचा काळ असल्याने शासनाने देखील मोठ्या प्रमाणात बीपीएल रेशनकार्डे दिली. तथापि, यंदा त्याला आधारकार्डची जोड दिल्याने रेशनकार्डच्या संख्येत कमालीची घट झाली. मात्र ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाल्याने एपीएल रेशनकार्डधारक सुध्दा नव्याने बीपीएल रेशनकार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न करु लागले. एकत्रित कुटुंब असून देखील रेशन मिळविण्यासाठी कुटुंंबाचे कागदोपत्री विभाजन मोठ्या प्रमाणात होऊ  लागले. त्याचा परिणाम वितरणावर होवून शासन दरबारी रेशनकार्डाची संख्या वाढली. निवडणूक काळात अन्न व नागरी पुरवठा खात्यामधील अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात गुंतला असल्याने मे महिन्यात केवळ तांदळाची आयात करण्यात आली आहे. गव्हाची आयात झालीच नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.