Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Belgaon › ऐतिहासिक १६३ वर्षांच्या नव्या सभागृहाचे मानकरी कोण?

ऐतिहासिक १६३ वर्षांच्या नव्या सभागृहाचे मानकरी कोण?

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:36AMनिपाणी : राजेश शेडगे

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रचाराचा धडाका सुरू आहे. 31 जागांसाठी रिंगणात असणार्‍या 130 उमेदवारांनी मतदारांचे उंबरठे झिजवून आपणास विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑगस्ट 1937  साली बांधण्यात आलेल्या निपाणी पालिकेच्या इमारतीला यंदा 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या सभागृहाचे मानकरी कोण होणार, हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

पालिकेच्या सभागृहाची मुदत 12 सप्टेेंंबररोजी संपणार आहे. स्थापना 1854 साली झाली असून पालिकेचे 164 वे वर्ष  आहे. शतकोत्तर अमृतमहोेत्त्सवाकडे वाटचाल करणार्‍या या पालिकेने अनेक दिग्गजांचा कारभार अनुभवला आहे. त्यामध्ये देवचंदजी शहा, बळवंत नाईक, वेणीचंद दोशी, कोठीवाले, बाळूमामा चव्हाण, मारूती रावण, हरी अमृता जासूद या मंडळींची नावे घ्यावी लागतील. 

पालिकेवर 1965 सालानंतर 18 वर्षे असलेली प्रदीर्घकालीन प्रशासकीय राजवट गेल्यावर प्रथम दौलतराव पाटील हे 1979 साली नगराध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी शहरात 11-12 चे राजकारण गाजले होते. 

पालिकेने एल. के. पठाण या नगराध्यक्षांचा दराराही अनुभवला आहे. 1 नोव्हेंबर 1987 रोजी निपाणी पालिकेचे टाऊन म्युनिसिपल कौन्सिलमधून सिटी म्युनिसिपल कौन्सिल असे रूपांतर झाले.  येथील नगरपालिका बेळगाव जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाची आहे. पालिकेत 1987 नंतर नगराध्यक्षपदी निवडून जाणार्‍यामध्ये सुभाष मेहता, विकास सावंत, प्रा. डॉ. अच्युत माने, नयनतारा नलवडे, प्रवीण सडोलकर-भाटले, भरत कुरबेट्टी, जयश्री लाखे, सुनिता होनकांबळे, विश्‍वनाथ मिसाळ, विश्‍वास शिंदे, विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राजेंद्र चव्हाण, शुभांगी जोशी. पुष्पा कुंभार, भारती घोरपडे, नम्रता कमते, सुजाता कोकरे व विलास गाडीवड्डर यांचा समावेश आहे.  आता निवडणुकीनंतर पालिकेच्या सभागृहाला नव्या नगराध्यक्षांचे वेध लागणार आहेत. आरक्षणाचे इच्छूक निवडणुकीत आपल्या विजयासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहेत. 2013 साली मार्च महिन्यात झालेल्या निवडणूकीनंतर पालिकेवर प्रशासकीय राजवट होती. 13 सष्टेंबर रोजी नगराध्यक्षांची निवड झाली होती. मावळत्या सभागृहातील सुमारे 14 नगरसेवक व नगरसेविका आणि 11 नातेवाईक पुन्हा आपले भविष्य आजमावण्यासाठी रिंगणात आहेत.  

अनेक वार्डात मतविभागणीचा धोका असल्याने निवडून कोण येणार, असे छातीठोकपणे सांगणेही कठीण  बनले आहे. अनेक सामान्यांनी एकला चलो रे चा नारा लावला आहे. यापूर्वी केवळ भडंग आणि चहावर होणारी निवडणूक आता लाखो रूपये खर्चाची झाली आहे. जिल्ह्यात निपाणी पालिकेची निवडणूक पक्षीय सहभागाने गाजत आहे. त्यामुळे कोणाला बहुमत मिळणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.