Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Belgaon › ‘मध्यवर्ती’च्या बरखास्तीचा अधिकार कुणाला?

‘मध्यवर्ती’च्या बरखास्तीचा अधिकार कुणाला?

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 11:27PMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म. ए. समितीच्या बरखास्तीची घोषणा करणे हास्यास्पद असल्याचे मध्यवर्ती म. ए. समितीने म्हटले आहे. शिवाय ज्यांनी बंडखोरी करून उमेदवार उभे केले आहेत, त्यांना तर अशी मागणीही करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मध्यवर्तीने म्हटले आहे. मध्यवर्ती समिती बरखास्त असे वृत्त एका दैनिकाने (पुढारी नव्हे) प्रसिद्ध केल्यानंतर त्या वृत्ताचे खंडन करणारे पत्र म. ए. समितीने काढले आहे. तसेच  मध्यवर्ती समितीला बहुतांशी सीमावासीयांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. 

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मध्यवर्ती म. ए. समितीने अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश मरगाळे यांची निवड केली आहे तर बेळगाव ग्रामीणमध्ये मनोहर किणेकर आणि खानापूर मतदार संघामध्ये अरविंद पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड जाहीर केली आहे. या उमेदवारांविरुध्द बंडखोर गटाने किरण सायनाक, मोहन बेळगुंदकर, विलास बेळगावकर यांची उमेदवारी जाहीर करून फुटीचे राजकारण सुरू केले आहे. या परिस्थितीत आता मध्यवर्ती म.ए.समिती काय करणार? मध्यवर्तीचा आदेश डावलणार्‍यांना कोणती शिक्षा देणार? असे प्रश्न सीमावासीय करत आहेत. त्यामुळे मध्यवर्ती समितीने पत्रकाद्वारे समितीची स्थापना व कामकाजाची माहिती कऴवली आहे.

बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर, निपाणी, बिदर, सुपा, कारवार, मंगसुळी या सीमाभागातील विभागीय म.ए.समितीमध्ये परस्पर सामंजस्य राहून केंद्र सरकार व कर्नाटक सरकारविरुध्द एखादे आंदोलन करावयाचे झाल्यास निर्णय घेण्यासाठी सर्व घटक समित्यांवर नियंत्रण ठेवणारी एक मध्यवर्ती म.ए.समिती स्थापन करावी या उद्देशाने 12 एप्रिल 1983 रोजी साथी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष राजाभाऊ माने, उपाध्यक्ष व्ही. वाय. चव्हाण, मल्लेश जुवेकर, संयुक्त चिटणीस निंगोजी हुद्दार व चंद्रहास धुमाळ, खजिनदार सुभाष जाधव  पदाधिकारी असलेली मध्यवर्ती म. ए. समिती निर्माण झाली.

मध्यवर्तीच्या 1983 ते 1993 या काळात एकूण 38 बैठका झाल्या. त्यातील 15 बैठकांना आताचे बंडखोर  नेते हजर होते, तर 23 बैठकांना ते उपस्थित नव्हते. 2009 मध्ये म.ए.समितीच्या घटक समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. बेळगाव शहरासाठी प्रा. एन. डी.  पाटील यांनी 40 जणांची निवड केली होती. सदर यादी प्रसिध्द होताच टी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती मध्यवर्तीच्या परवानगीविना स्थापन झाली. त्यामुळे मूळ 40 जणांच्या यादीतील सभासदांनी दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य सुरू केले व मध्यवर्तीत 11 सभासदांची यादी पाठविली. बेळगाव तालुका, खानापूर तालुका व बिदर यांचीही नावे आली. कारवार-मंगसुळीची पूर्वीचीच नावे ठेवण्यात आली. या मध्यवर्तीच्या सभासदांच्या आजपर्यंत जवळजवळ 125 हून अधिक बैठका झाल्या. केवळ चारच बैठकांना बंडखोर नेते हजर होते.

बंडखोर अध्यक्ष असलेला गट, म्हात्रू झंगरुचे अध्यक्ष असलेला गट आणि  खानापूरचे निलंबित अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी मध्यवर्ती बरखास्त केल्याचे पत्रक काढणे हे केवळ हास्यास्पद आहे.  दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असलेली मध्यवर्ती म.ए.समिती गेली 25 वर्षे समितीचे कार्य समर्थपणे करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचे कामही डोळ्यात तेल घालून करीत आहे. मध्यवर्तीशी काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्‍तींनी मध्यवर्तीची बरखास्ती करण्याबाबत पत्रक काढून स्वतःला हास्यास्पद बनविले आहे. सीमाभागातील जनता असल्या उपद्व्यापांना भीक घालणार नाही, असा विश्‍वासही पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

मराठी भाषिकामधील काही उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेने मध्यवर्ती म.ए.समितीने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करून त्यांना निवडून आणावे, असे आवाहनही मध्यवर्ती म.ए.समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.