Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Belgaon › वडगावात विशेष उपचार केंद्र कधी?

वडगावात विशेष उपचार केंद्र कधी?

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव -खासबाग विभागामध्ये चिकनगुनिया व डेेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्या परिसरातील नागरिक गरीब असल्याने वैद्यकीय उपचार करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिकेने खास केंद्र स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. ती प्रत्यक्षात कधी येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या परिसरातील प्रत्येक घरामध्ये चिकनगुनिया किंवा डेंग्युचे रुग्ण आहेत. खासगी इस्पितळामध्ये दाखल होऊन उपचार घेण्याकरिता त्यांना आर्थिकदृष्ट्या महागात पडत आहे. तसेच महागडी औषधेही त्यांना खरेदी करणे परवडणारे नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिकेने चिकनगुनिया आणि डेंग्युवर प्रभावी वैद्यकीय उपचार करण्याकरिता त्या ठिकाणी खास वैद्यकीय उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागातील नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यास केंद्र सुरू होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

यासंदर्भात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, वडगाव व खासबागमधील चिकनगुनिया व डेंग्यु रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी वडगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रावर सोपविण्यात आली आहे. एखाद्या रुग्णावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करणे त्या उपकेंद्रातील डॉक्टरांना अशक्य वाटले तर संबंधित  रुग्णाला पुढील उपचाराकरिता जिल्हा इस्पितळाकडे पाठवून देण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये संबंधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याची जबाबदारी वडगावमधील उपकेंद्रावर सोपविण्यात आली आहे. त्या केंद्रामध्ये रुग्णांनी जाऊन उपचार घ्यावेत, अशी सूचनाही डॉ. नाडगौडा यांनी केली आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उपकेंद्रावर चिकनगुनिया व डेंग्यु रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तरीही त्या उपकेंद्राचा  दर्जा उंचावण्यासाठी बेळगाव मनपाने व नगरसेवकांनी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. दर्जा उंचावण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर व कर्मचार्‍यांची संख्याही वाढविली जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कितीही रुग्ण आले तरी त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करणे सोयीस्कर ठरणार आहे. त्याकरिता मनपा सभागृहानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. परिसरात रोजच फॉगिंगची गरज आहे. काही भागात याची फवारणी होत असली तरी ती कमी पडत आहे. फॉगिंगमुळे डासांची पैदास रोखता येते.