Fri, May 24, 2019 07:02होमपेज › Belgaon › थकीत ऊस बिले मिळणार कधी?

थकीत ऊस बिले मिळणार कधी?

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 9:42PMबेळगाव : परशराम पालकर

साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांचे 129 कोटीचे  बिल देणे बाकी आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांना विविध शेतकरी संघटनेने निवेदन देऊन बिले देण्याची विनंती केली. बिले मिळाली नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. चार जणांनी दयामरणाचा अर्ज देऊन बिल वसुलीबाबत राज्याचे लक्ष वेधले. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी कारखानदारांच्या व्यवस्थापकांना बोलावून अहवाल मागविला. त्वरित बिले देण्यासाठी नोटिसाही बजावल्या. मात्र अद्याप शेतकर्‍यांना रक्‍कम मिळालेली नाही. कारखानदार नाही तर शेतकरीच का आत्महत्या करतात, हा मुद्दा ऐरणीावर आला आहे.

जिल्ह्यात 37 साखर कारखाने असून त्यापैकी 17 कारखानदारांनी बिले थकविली आहेत. 568 कोटी थकित रकमेपैकी 28 जूनपयर्र्ंत 429 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. निवडणूक काळात माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी कारखानदारांकडून बिले थकित राहणार नाहीत अशी ग्वाही दिली होती. मात्र कारखानदार राजकीय व्यक्ती असल्याने त्यांनी सुध्दा बोटचेपी भूमिका घेतली. रेणुका शुगरने दोन आठवड्यात 64 कोटीचे बिल शेतकर्‍यांना अदा केले आहे. उर्वरीत अथणी शुगर, उगार शुगर, सतीश शुगर, घटप्रभा एस. एस. के, मलप्रभा एस के. यांनी अजून शेतकर्‍यांची बिले देण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. 

बिल मिळण्याबाबत शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले. कित्येक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे नेले, अधिवेशन काळात ते संपेपर्यंत आंदोलन छेडले जाते, या काळात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, तर काहीनी उपचारासाठी पैसे न मिळाल्याने या जगाचा निरोप घेतला. चार वर्षापासून साखर कारखाने बिल देत नाहीत म्हणून चार शेतकर्‍यांनी दयामरणाचा अर्ज जिल्हाधिकार्‍यांना दिला. तरीदेखील शासन केवळ नोटीस बजावून बिले देण्यासाठी तगादा लावत आहे. त्या पलिकडे कोणतेच कार्य होत नाही. 

साखर जप्तीचे काय झाले?

शेतकर्‍यांची बिले दिली नाहीत तर साखर जप्त करून बिले भागविली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी एस. झियाउल्‍ला यांनी दिला होता. त्याचे पुढे काय झाले ते समजले नाही. 

कारखानदार आत्महत्या करीत नाहीत

कोट्यवधीची बिले कारखानदारांकडून शेतकर्‍यांना मिळणे बाकी आहे. जिल्ह्यातील बिल थकविलेल्या कोणत्याही कारखान्याला टाळे ठोकण्याची वेळ आली नाही. एवढी मोठी रक्कम देणे असूनदेखील कोणत्याच  कारखानदाराने आत्महत्या केली नाही. शेतकरी मात्र लाखभर कर्जाला घाबरुन आत्महत्या करतो. 

शेतकरी आत्महत्या का करतात?

कारखानदारांकडून उसाची बिले मिळाली नाहीत, म्हणून काही शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. बँका व सहकारी सोसायट्यांच्या नोटिसांचा धसका घेऊन काहुंनी अंथरूण धरले आहे. कोट्यवधी रुपयाची देणे असणारे साखरसम्राट आत्महत्येचा विचार मनातदेखील आणत नाहीत. शेतकरी मात्र लाखभर कर्जाला घाबरुन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. यासाठी शेतकर्‍यांची मानसिकता बदलायला हवी.