Sun, Jul 21, 2019 16:51
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ज्योतीनगरात कधी उजळणार विकासज्योती?

ज्योतीनगरात कधी उजळणार विकासज्योती?

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 8:26PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरापासून तीन किमीवर असलेला ज्योतीनगर परिसर रोगराईचे आगार बनला आहे. कचरा, दुर्गंधी, डुकरांची समस्या यामुळे चिकुन गुणियाबरोबरच डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मात्र आरोग्य खात्याने दुर्लक्ष केल्याने रहिवाशी रामभरोसे आहेत.

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात ज्योतीनगरचा समावेश होतो. लोकवस्ती तीन हजारहून अधिक. रहिवाशांचा मुख्य व्यवसाय स्कॅ्रप जमा करण्याचा आहे. शहर आणि परिसरातील स्क्रॅम जमा करून त्याची विक्री करून त्याचा उदरनिर्वाह केला जातो. 

सध्या  वसाहतीत रस्ते व गटारींची व्यवस्था  चांगली आहे. यामुळे पाण्याचा निचरा होतो. मात्र ठिकठिकाणी असलेल्या रिकाम्या ठिकाणी दलदल माजली आहे. त्यातून डासांची उत्पती झपाट्याने होते. त्यामुळे डेंग्यूची लागण वाढली आहे.

ज्योतीनगरात रोगराई

सध्या ज्योतीनगर या भागात किमान पाच डेंग्यू रुग्ण आहेत. त्याचबरोबर अनेक रुग्णांना चिकुन गुणियाची लागण झाली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशी भयभीत झाले असून यासंदर्भात आरोग्य खात्याकडे उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामपंचायतीने डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्याची व स्वच्छता ठेवण्याची मागणी होत आहे. सांडपाणी व साचलेली दलदल स्वच्छ करण्यासाठीही ग्रा.पं.कडून प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

सुधारणेसाठी प्रयत्न

ज्योतिनगरातील नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या भागात किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध झाल्या आहेत, मात्र पावसाळ्यात  निर्माण होणार्‍या दलदलीचा फटका सार्‍यांनाच बसतो आहे.