Fri, Aug 23, 2019 14:43होमपेज › Belgaon › निपाणी अग्‍निशमन इमारतीचे उद्घाटन कधी?

निपाणी अग्‍निशमन इमारतीचे उद्घाटन कधी?

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:30PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी व परिसराच्या सुरक्षेसाठी आधुनिक फायर स्टेशन व कर्मचार्‍यांसाठी क्‍वॉर्टर्स बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने गतवर्षी 6 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर केला होता. हे काम पूर्ण  होऊन 6 महिने झाले तरीही केंद्राचे उद्घाटन झालेले नाही.

सदर कामाचा पायाखोदाई समारंभ 10 ऑगस्ट 2017 रोजी आ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला. नव्या केंद्रात 2 अधिकारी व 12 कर्मचारी असतील. 2 अग्निशमन गाड्या व एक बचाव पथक वाहन कार्यरत राहणार आहे. सर्व्हे नं. 132 मधील 1 एकर 4 गुंठे जागा नगरपालिकेने केंद्रास दिली आहे. सदर जागेचे बाजारभावाप्रमाणे नगरपालिकेस मूल्य देणे आवश्यक होते. सदर बाब आ.  जोल्ले यांनी विधानसभेत उपस्थित करून जागा बाजारभावाच्या 25 टक्केप्रमाणे खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर आ. जोल्ले यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व संबंधितांशी चर्चा करून नूतन इमारतीचे काम पूर्ण केले.

निपाणीत शासकीय अग्निशमन बंब कार्यरत झाल्याने तीन-चार वर्षात अनेक आगीच्या लहान-मोठ्या घटनांवर वेळीच नियंत्रण आणण्यात केंद्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चालू वर्षात आजतागायत 28 आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे. 2014 मध्ये 31 घटना, 2015 मध्ये 47, 2016 मध्ये 47, 2017 साली आगीच्या 32 घटना घडल्या आहेत. आगीच्या घटना, अपघात, विहिरीत पडलेल्यांना आपत्कालीन सेवा देण्यास हे केंद्र सज्ज आहे. सध्या केंद्रात 20 कर्मचारी कार्यरत आहेत. निपाणी शहर, बसवेश्‍वर चौक व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रासाठी हे दल कार्यरत आहे. आता नूतन केंद्र इमारतीचे उद्घाटन केव्हा होणार, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.