Sun, Sep 23, 2018 06:01होमपेज › Belgaon › महिलेच्या प्रसूतीसाठी रेल्वे थांबते तेव्हा...

महिलेच्या प्रसूतीसाठी रेल्वे थांबते तेव्हा...

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:52AMबेळगाव : प्रतिनिधी

भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह बहुतांश ठिकाणी खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामळे अनेकांना रेल्वेचा आधार घ्यावा लागला. एका महिलेने तर रेल्वेमध्येच बाळाला जन्म दिला. रेल्वे प्रशासनानेही तत्परता राखून महिलेच्या प्रसूतीदरम्यान अर्धा तास रेल्वे थांबविली. सदर घटना रायबाग रेल्वेस्थानकावर घडली. 

रायबाग तालुक्यातील शाहूपाकर गावातील यल्लव्वा गायकवाड असे सदर मातेचे नाव आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. यामुळे परिवहन मंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बहूतांश नागरिकांना रेल्वेने प्रवास करावा लागला. सदर महिला कोल्हापूरहून रायबागला रेल्वेतून प्रवास करत होती. याचवेळी तिला प्रसूती वेदना सरु झाली. दरम्यान, रेल्वेतील इतर प्रवाशांनी महिलेची अडचण लक्षात घेत सदर माहिती सरकारच्या आरोग्य कवच सेवा (108) विभागाला दिली. रेल्वे रायबाग स्थानकावर आल्यानंतर आरोग्य कवच कर्मचार्‍यांनी महिलेला प्रसूतीसाठी रेल्वेतून आपल्या वाहनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेला रेल्वेतून आणणे अशक्य असल्याचे आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले. सदर माहिती रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तराला देण्यात आली. काही वेळ रेल्वे थांबविण्याची विनंती करण्यात आली. रेल्वे स्टेशन मास्तरांनी नागरिकांची मागणी लक्षात घेत 20 मिनिटी रेल्वे थांबविली. 

रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या आरोग्य कवच सेवा विभागाच्या कर्मचार्‍यांनी आवश्यक साहित्यासह महिलेची रेल्वेमध्येच प्रसूती केली. यानंतर माता व बाळाला आरोग्य कवच वाहनातून रायबाग सरकारी इस्पितळाला दाखल करण्यात आले. आरोग्य कवच विभागाचे यमनप्पा पवी, सलीम व स्टेशनमास्तरांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांतून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.