Tue, May 21, 2019 18:32होमपेज › Belgaon › स्मशानभूमीतील अस्थी बदलतात तेव्हा...

स्मशानभूमीतील अस्थी बदलतात तेव्हा...

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:56AM
बेळगाव : प्रतिनिधी

अंत्यविधी उरकल्यानंतर तीन दिवसांनी अस्थी भरणी करण्यासाठी आलेल्या कुंटुंबीयांना तेथील अस्थी व राख कोणी तिर्‍हाईताने  भरुन नेल्याचे निदर्शनास येताच नातेवाईकांची तारांबळ उडाली. तेथील कर्मचार्‍याला धारेवर धरताच अर्ध्या तासात अस्थी  परत आणून संबंधित नातेवाईकांना दिल्याची घटना सोमवार दि. 16 रोजी सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये घडली. 

सोमवारी सकाळी 8 वाजता खडक गल्लीतील आडाव कुटुंबीय सदाशिवनगर स्मशानभूमीध्ये  अस्थी भरण्यासाठी आले. मात्र  ज्या ठिकाणी अंत्यक्रिया विधी उरकला होता त्या ठिकाणी अस्थि नसल्याचे पाहून त्यांनी धसका घेतला. यावेळी हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍याच्या निदर्शनास आणून दिला. अस्थीच गायब झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्या कर्मचार्‍याला नातेवाईकांनी धारेवर धरताच त्याने ज्यांनी अस्थी व राख भरुन नेली. त्यांचा शोध घेऊन आडाव कुंटुंबीयांकडे अस्थी सुपूर्द केल्या. मात्र यामुळे खडक गल्लीतील आडाव कुंटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

खडक गल्लीतील बाबुराव पुुन्नाप्पा आडाव यांचे शनिवार दि. 14 रोजी निधन झाले. सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये शवदाहिनी क्र. 3 मध्ये त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्याप्रमाणे तेथील मृत्यूची नोंद घेणार्‍या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात आली. त्याअगोदर शुक्रवार दि. 13 रोजी आप्पया नाईक यांच्यावर शवदाहिनी क्रं. 4 मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी खाडाखोड करुन 4 ऐवजी 3 अशी रजिस्टरमध्ये नोंद  केली गेली. त्यामुळे नाईक कुटुंबीयांनी 4 ऐवजी 3 नंबर शवदाहिनीमधील राख भरुन ती विजर्सन करण्यासाठी कंग्राळी येथील मार्कंडेय नदीकडे प्रयाण केले.

नाईक कुटुंबीय सदाशिवनगर स्मशानभूमीमधून गेल्यानंतर आडाव कुंटुंबीय तेथे दाखल झाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  अखेर आडाव कुंटुंबीयांना अस्थी मिळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यापूर्वीही घडला होता असा प्रकार यापूर्वीही सदाशिवनगर स्मशानभूमीतील अस्थी तिर्‍हाईतांनी खानापूरच्या मलप्रभेत विसर्जन करण्यासाठी नेल्या होत्या. त्यावेळी खानापूरला जाऊन अस्थी मिळविल्याची माहिती लाकूड अड्ड्याचे मालकांनी ‘पुढारी’ला दिली.

Tags : bone marrow changes ,belgaon news