Sat, Apr 20, 2019 16:41होमपेज › Belgaon › आत्महत्येनंतर नुकसान भरपाई काय कामाची?

आत्महत्येनंतर नुकसान भरपाई काय कामाची?

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 10:40PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यात  शेतकर्‍यांकडून घेण्यात आलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. कोबी केलेल्या शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कोबीसह इतर भाजीपाला घेतलेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणीची निवेदने अनेकवेळा देण्यात आली. आत्महत्येनंतर भरपाई काय कामाची,असा संतप्‍त सवाल, शेतकर्‍यंनी केला.  प्रशासनाने आत्महत्येनंतर भरपाई देण्याचे अवलंबले धोरण किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

तालुक्यामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना गेल्या तीन ते चार महिन्यापासून नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याचा भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी कंगाल झाला आहे. उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकर्‍यांनी उत्पादन केलेल्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, अशी मागणी अनेक वेळा करूनही सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. 

तालुक्यामध्ये जवळपास 10 हजार एकर जागेमध्ये शेतकर्‍यांनी कोबी पिकाचे उत्पादन घेतले आहे. मात्र कोबीला भाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यासाठी शेतकर्‍यांकडून जिल्हा प्रशासनाला भरपाई देण्यासाठी निवेदने देण्यात आली मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही. राजकीय पक्षांनीही शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकर्‍यांना केवळ 
आश्‍वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

आत्महत्या रोखण्यासाठी   सरकारकडून ठोस धोरण अवलंबण्यात येत नसल्याने आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना सरकारकडून कोणतीच मदत केली जात नाही. आत्महत्येनंतर मात्र भरपाई दिली जाते. ती काय कामाची , असा सवालही शेतकर्‍यांतून उपस्थित करण्यात येत आहे. कोबी पिकासह इतर पिकांची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. शेतकर्‍यांना वेळीच भरपाई दिली तरच आत्महत्या रोखणे शक्य आहे. यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
यावेळी रयत संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, रामगौडा पाटील, गजू राजाई, राजू कागणीकर, सुभाष धायगुंडे, यल्लाप्पा दुंडगी, टोपण्णा बसरीकट्टी आदी उपस्थित होते.

Tags :What, compensate after suicide? belgaon news