Mon, May 20, 2019 08:53होमपेज › Belgaon › पोलिस करतात काय?

पोलिस करतात काय?

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 8:04PMजांबोटी : वार्ताहर

जवळपास चाळीसएक गावांचे मध्य व शांततेचे ठिकाण म्हणून जांबोटी स्थानकाची असलेली ओळख पुसत चालली आहे. गेल्या पाच वर्षात चोर्‍या, खून आणि अवैध धंद्यामुळे जांबोटी पश्‍चिम भाग गुन्हेगारीमध्ये चर्चेत आहे. यावर पोलिसांची नजर कमी झाल्याने गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. असे असताना तालुका पोलिसांकडून कोणत्याच उपाययोजना आखण्यात आल्या नसून झालेल्या गुन्हांचाही छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले आहे. यामुळे पोलिस करतात काय, असा प्रश्न उपस्थित होतो. 

पाच वर्षापासून जांबोटी स्थानकावर चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. व्यावसायिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत जांबोटी स्थानकावर झालेल्या एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे सराईत चोरट्यांकडून चोर्‍यांचे सत्र सुरुच आहे. दुसरीकडे जांबोटीसह गोल्याळी,चोर्ला घाट, आमटे, कणकुंबी परिसरात अवैध धंद्यासह गुन्हेगारी वाढली आहे. बेळगावसह इतर ठिकाणी खून करुन सदर व्यक्तीचा मृतदेह लपविण्यासाठी चोर्ला घाटासह वरील ठिकाणांचा वापर होत असल्याचे अनेक गुन्ह्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. यात चोर्ला मार्गावर होणारे अपघात आणि दोन वर्षात वाढलेल्या चोर्‍यांमुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

चोरटे स्थानिक असल्याचा संशय  

चार वर्षात जांबोटी स्थानकावर चार वेळा लहान मोठ्या चोर्‍या झाल्या आहेत. यात गेल्या आठवड्यात झालेल्या कणकुंबी आरोग्य केंद्रातील बॅटर्‍या चोरीची भर पडली आहे. या चोर्‍या मध्यरात्री झाल्या असून त्यात स्थानिकांचा समावेश असल्याचा संशय बळावला आहे. पाळत ठेवून चोर्‍या झाल्याचे उघडकीस आले आहे. जांबोटी पोलिस स्थानकात मनुष्यबळाची कमतरता असल्याने झालेल्या चोर्‍या आणि गुन्ह्यांचा वेळेत छडा लावणे अवघड जात असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे असले तरी पाच जागा असताना दोनच पोलिस कार्यरत आहेत. ही संख्या वाढणे गरजेचे आहे.