होमपेज › Belgaon › कर्नाटक सरकारची चिंता वाढवणारी ‘पीएलडी’ बँक

कर्नाटक सरकारची चिंता वाढवणारी ‘पीएलडी’ बँक

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणारी पीएलडी बँक म्हणजे नेमके आहे तरी काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. बड्या राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार्‍या बँकेबाबत अनेकांकडून विचारणा करण्यात येत आहे. अनेक वर्षापासून कार्यरत असणार्‍या या बँकेविषयी अनेकांना काहीच माहिती नाही. 

महाद्वार रोडवरील धर्मवीर संभाजी उद्यानासमोर असणार्‍या एका चिंचोळ्या बोळात बँकेचे कार्यालय आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बँकेमार्फत कार्य केले जाते. भूविकास बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे कार्यक्षेत्र बेळगाव शहर आणि तालुका आहे. शेतीसाठी आवश्यक कर्जपुरवठा केला जातो.

बँकेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 साली झाली आहे. इंग्रजांच्या राजवटीपासून बँकेचे कामकाज सुरू आहे. बँकेला 83 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. बँकेची एकूण 5005 इतकी सभासद संख्या आहे. यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर 454 इतके नवीन सभासद करून घेतले आहेत.  2017 पर्यंत बँकेचे 72 लाख इतके भागभांडवल होते. ते यावर्षी कोटीपर्यंत पोहोचले आहे. बँक इतक्या प्रदीर्घ काळापासून सुरू असूनदेखील अनेक नागरिकांना बँकेबाबत पुरेशी माहिती नाही. 2013 मध्ये झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीपासून बँकेविषयी काही प्रमाणात चर्चेत आली. बँकेमार्फत शेती व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. परंतु आजवर वर्षाला 100 शेतकर्‍यांनादेखील सरासरी कर्ज वितरण करण्यात आलेले नाही.  2017 ते 2018 या काळात बँकेकडून केवळ 10 कोटी रु. कर्ज वितरण केले आहे. 

बँकेच्या आजवर 81 सर्वसाधारण सभा पार पडल्या आहेत. 82 वी सर्वसाधारण सभा 18 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. सध्या बँकेच्या संदर्भात सुरू असणार्‍या घडामोडींमुळे  सर्वसाधारण सभा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  बँकेतर्फे शेतीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टीलर, ठिबक सिंचन, विहीर खोदाई सारख्या योजनांना कर्जपुरवठा केला जातो. प्रामुख्याने शेतकर्‍यांना याचा लाभ घेता येतो. मात्र अनेक शेतकरी  याविषयी अनभिज्ञ आहेत. 

कर्मचार्‍यांची कमतरता

राजकारणाच्यादृष्टीने अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या बँकेचा डोलारा केवळ चार कायमस्वरुपी कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. यापैकी महिला कर्मचारी प्रसूती रजेवर आहे. आठ जागा रिक्त आहेत. यामुळे अन्य कर्मचार्‍यांनाच बँकेचे कामकाज पाहावे लागते. तीन कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेली आहे. यामुळे कर्मचार्‍यांची अडचण आहे.