होमपेज › Belgaon › जप्त केलेल्या तांदळाचे पुढे झाले काय?

जप्त केलेल्या तांदळाचे पुढे झाले काय?

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 10:08PMनिपाणी : मधुकर पाटील

गरीबांचे धान्य अवैधरित्या परस्पर विकणार्‍या आंतरराज्य टोळीतील 10 जणांना  गेल्या वर्षभरात निपाणी ग्रामीण पोलिसांनी पकडले. पण अटकेव्यतिरिक्त त्यांच्यावर पुढची कारवाई न झाल्याने अवैधरित्या धान्य जप्त करूनही त्याचे झाले काय, हा प्रश्न आहे.

एकदा तांदूळ पकडला गेल्यानंतरही लगेचच चार महिन्यांच्या काळात तीनदा अवैधरित्या तांदूळ-धान्य विक्रीसाठी नेण्याचे धाडस काळा बाजार करणार्‍यांचे झाले. पूर्वीच्या तीनवेळच्या कारवाईतील मुख्य गुन्हेगार मोकाट असल्याने तपास यंत्रणेकडून झालेला व होणारा तपास संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. निपाणी हे सीमावर्ती केंद्र असून हा मार्ग तस्करीचा मार्ग म्हणून ओळखला जातो आहे. अवैध व्यवसाय करणार्‍यांकडून त्याचा फायदा वेळोवेळी उठविला जात आहे. त्यामुळे अंमली पदार्थ,मद्य, प्राणी, पक्षी, रक्तचंदन, सोने, चांदी, अवैध रोखड, स्फिरिटसह रेशनवरील धान्याची तस्करी होत असते. महामार्गावरील टोल, आरटीओ व पोलीस चौकीचा मार्ग सोडून अन्य मार्गाचा संबंधितांकडून वापर केला जातो. त्यामुळे बर्‍याचवेळा खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई होते.

वर्षभरातील तस्करी प्रकरणांचा आढावा घेतला असता अन्य प्रकारच्या वस्तू आणि ऐवजाची तस्करी वगळता रेशनवरील तांदूळ व धान्याची तस्करी वारंवार उजेडात आली आहे. 2017 मध्ये दोनवेळा तर यंदा 2018 मध्ये जानेवारी व 14 जुलै रोजी मध्यरात्री तांदूळ तस्करी उजेडात आली आहे. 

केवळ एकाच दुकानातून अथवा गावातून तस्करीव्दारे पकडण्यात आलेला तांदूळ खुल्या बाजारात आणला जात नाही. तर मूळ पुरवठा घटकांशी निगडीत अधिकारीवर्गच याला कारणीभूत असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. रविवारी उघडकीला आलेल्या तांदूळतस्करी प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांनी हुबळी येथील संबंधित ट्रॉन्सपोर्ट कंपनीचे ऑफिस गाठून चालविला आहे. हा तपास पूर्ण होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली तरच पुढच्या तस्करीला आळा बसेल, अन्यथा पुन्हा काही महिन्यांनी रेशनचा आणि गरीबांच्या तोंडात जाणारा तांदूळ पुन्हा काळा बाजारात जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

अलोककुमार यांच्या सूचनेमुळेच कारवाई

उत्तर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांना खबर्‍याने शनिवारी रात्री  महामार्गावरून हुबळी येथून महाराष्ट्रात रेशनवरील तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती दिली होती.त्यानुसार अलोककुमार यांनी तातडीने निपाणी ग्रामीण पोलिसांना सूचना करीत महामार्गावर सतर्क राहण्यास सांगितले. अलोककुमार यांच्याकडून सूचना आली नसती तर तस्करी  प्रकरण सापडले नसते.

पोलीस यंत्रणेसमोर प्रश्‍न

निपाणी ग्रामीण पोलिसांकडून वर्षभरात चौथ्यांदा अशी कारवाई झाली आहे. पूर्वीच्या तीनवेळच्या कारवाईत तीन ट्रकमधून 75 टन रेशनवरील तांदूळ  पकडून सहाजणांना पोलिसांनी गजाआड केले. आयजीपींना माहिती मिळाल्याने कारवाई सक्षमरित्या झाली. पण महामार्गावर कोगनोळी हद्दीत स्वतंत्र चौकी असताना अशी तस्करी उघडकीस येत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर प्रश्‍न उभार ठेपला आहे.